कर्नाटक पोलिसांची मग्रुरी, महाराष्ट्राचे राज्यमंत्री यड्रावकर यांना धक्काबुक्की आणि अटक

yadravkar-arrested

इचलकरंजी : महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना आज शुक्रवारी कर्नाटक पोलिसांनी धक्काबुक्की करीत अटक केली. हा संतापजनक प्रकार कर्नाटकातील बेळगाव येथील हुतात्मा चौकात घडला. यड्रावकर हे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि सांस्कृतिक कार्य खात्याचे राज्यमंत्री आहेत.

सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी ते बेळगाव येथे गेले होते. सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना दरवर्षी १७ जानेवारी रोजी बेळगावच्या हुतात्मा चौकात अभिवादन केले जाते. राज्यमंत्री यड्रावकर व कर्नाटक पोलिस यांच्यात वादावादी होऊन त्यांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला आहे.

नरखेड पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या नीलिमा रेवतकर

महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी बेळगावात येऊ नये, यासाठी कर्नाटक पोलिस राष्ट्रीय महामार्गावर पहाटेपासूनच वाहनांची तपासणी करीत होते, मात्र, यड्रावकर हे कोणताही सरकारी फौजफाटा न घेता मध्यरात्रीच बेळगावात पोहचले. आज सकाळी ते हुतात्मा चौकात अभिवादनासाठी हजर झाले. अभिवादन सुरू असतानाच त्यांना पोलिसांनी अडविले आणि धक्काबुक्की करीत अटक केली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा प्रकार घडला. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.