सांगलीत महापौर पदासाठी घोडेबाजार तेजीत

Mayor Election - Sangli

सांगली : महापौर आणि उपमहापौर पदासाठी घोडेबाजार तेजीत आला आहे. भाजपचे (BJP) नऊ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. गायब’ नगरसेवकांमुळे भाजपच्या गोटात चिंता वाढली आहे. दरम्यान, महापौरपदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीत रस्सीखेच कायम आहे. काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी (NCP) नेत्यांची शनिवारी बैठक झाली. चुरस, अनिश्चितता, अविश्वास यामुळे या निवडणुकीत प्रथमच मोठा रंग भरला आहे.

महापौर, उपमहापौर निवडणूक दि. 23 रोजी आहे. बहुमतासाठी 39 नगरसेवकांची गरज आहे. महापालिकेत सत्ताधारी भाजपचे संख्याबळ 43 आहे.

मात्र भाजपचे 9 नगरसेवक गेले दोन दिवस ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. बहुमत नसतानाही राष्ट्रवादी व काँग्रेसने निवडणुकीत रंगत आणली आहे. घोडेबाजार, उमेदवारांची पळवापळवी यामुळे निवडणूक संघर्षाच्या वळणावर येऊन ठेपली आहे.

मतदानादिवशी गैरहजर राहणे, पक्षविरोधी मतदान करणे यासाठी फार मोठ्या ऑफर असल्याची चर्चा जोरात आहे. महापौरपदाची ही निवडणूक खर्चाचे आजपर्यंतचे सारे रेकॉर्ड ब्रेक करील, असे चित्र दिसते आहे. त्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे.

सत्ताधारी भाजप व सहयोगी 43 नगरसेवकांपैकी सुमारे 17 नगरसेवक गुरूवारीच गोवा सहलीवर गेले आहेत. उर्वरित काही नगरसेवक आज सहलीवर जाणार आहेत.

‘नॉट रिचेबल’ 9 नगरसेवकांना परत कसे आणायचे यासंदर्भात भाजपच्या गोटात हालचाली सुरू आहेत.

कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण, यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

महापौरपदासाठी उत्तम साखळकर च्या उमेदवारीवर काँग्रेस ठाम आहे; मात्र बहुमताच्या जुळणीच्या अनुषंगाने काँग्रेस व राष्ट्रवादीत काही निर्णय झाले आणि महापौरपदासाठी राष्ट्रवादीला उमेदवारी निश्चित झाली, तर राष्ट्रवादीचे मैनुद्दीन बागवान व दिग्विजय सूर्यवंशी या दोन उमेदवारांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची, हे काँग्रेस नगरसेवकांच्या पसंतीने ठरले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER