संविधान बदलणार असल्याची अज्ञातांकडून सरसंघचालकांविरोधात सोशल मीडियावर पुस्तिका : संघाकडून पोलिसांत तक्रार

Mohan Bhagwat

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या नावाने “नया भारतीय संविधान” नावाची हिंदी भाषेतील 16 पानांची ही पुस्तिका सोशल मीडिया आणि ई-मेलच्या माध्यामातून व्हायरल करून त्यात रा. स्व. संघाची बदनामी केल्या जात आहे. या प्रकारची बदनामी करणा-याला पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. याबाबात संघाचे महानगर कार्यवाह अरविंद कुकडे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या पुस्तिकेशी संघाचा कुठलाही संबंध नसल्याचे महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी पत्रपरिषदेत म्हटले आहे.

संघाने अशा प्रकारची “नया भारतीय संविधान” पुस्तिका प्रकाशित केलेली नसल्याचे गाडगे यांनी म्हटले आहे. पीडीएफ स्वरुपातील फाईलमध्ये असलेली ही पुस्तिका असामाजिक आणि संघ विरोधकांकडून प्रसारित केल्या जात आहे. पुस्तिकेत अशा प्रकारचा मजकूर आहे की ज्याचा संघाशी काहीही संबंध नाही. संघाचे संविधानाबाबत स्पष्ट विचार आहे. ज्यांना सरसंघचालकांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेळोवेळी व्यक्त केले आहेत.

संघाचा भारतीय संविधानावर संपूर्ण विश्वास असून नव्या संविधानाबाबत संघाने कुठलाही प्रस्ताव मांडला नाही. संघात जातीभेदाला कुठलेही स्थान नसून खुद्द महात्मा गांधीजींनी संघाच्या शिबिरांना प्रत्यक्ष भेऊ देऊन संघाची विशेष स्तुती केली असल्याचे रा. स्व. संघाच्या नागपूर महानगर कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धि पत्रकात महानगर संघचालक राजेश लोया आणि महानगर सह संघचालक श्रीधर गाडगे यांनी म्हटले आहे.

हा मानहानीकारक व धमकाविणारा मजकूर पूर्णत: खोटा आहे. ही फाईल सामान्य नागरिकांमधे गेल्यास त्याचे वाईट परिणाम होतील. समाजात अस्थिरता निर्माण करू इच्छिणाऱ्याचाच हा प्रताप असून, संघाने असे कोणतेही “नया भारतीय संविधान’ सुचवले नसल्याचे श्रीधर गाडगे म्हणाले. या पुस्तिकेत डॉ. मोहनजी भागवत यांनी ती लिहिल्याचे खोटे नमूद करण्यात आले असून, सध्याचे भारतीय संविधान बदलून केवळ उच्चवर्णीयांना सर्व क्षेत्रात प्राधान्य देणारे नवे संविधान लागू करण्याची योजना असल्याची माहिती यात नमूद आहे. अनुसूचित जाती-जमाती, मागास प्रवर्गांवर अन्याय करण्यासाठी नवे संविधान वापरले जाईल, अशा आशयाचे संदेशही या पुस्तिकेच्या असून हा प्रकार करणाऱ्याविरूद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी संघाने केली आहे.

सदर पुस्तिकेच्या शेवटी नागरिकांना नव्या संविधानाविषयी आपल्या सूचना वा सल्ला पाठवावा, असे आवाहनदेखील करण्यात आले असून, पंतप्रधान कार्यालय, नवी दिल्ली येथे दि. 15 मार्च 2020 पर्यंत सूचना स्विकारल्या जातील, असे त्यात म्हटलेले आहे. सदर पुस्तिका कोणी छापली, त्या प्रकाशन-प्रकाशकाचे नाव, पत्ता, आवृत्ती वा अन्य कुठलीही माहिती कोणत्याही पानावर दिलेली नाही. मात्र, कायदेशीररित्या कोणतेही पुस्तक छापले जात असेल तर त्यात प्रकाशन-प्रकाशकाचे नाव, आयएसबीएन वा नोंदणीक्रमांक असणे गरजेचे असते. या पुस्तिकेवर मात्र तशी कोणतीही माहिती नसल्याने केवळ बुद्धीभेद करण्यासाठी व विशिष्ट समाजाला भडकवण्यासाठीच ही पुस्तिका प्रसारित करण्यात येत असल्याचे श्रीधर गाडगे म्हणाले.