महाजनांना धमकी : एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ !

girish-mahajan

जळगाव : ‘एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ’ अशी धमकी भाजप (BJP) नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.

जामनेरमध्ये जी. एम. फाउंडेशनच्या ग्लोबल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक दीपक तायडे यांना आलेल्या निनावी फोनवरून ही धमकी देण्यात आली. गिरीश महाजन यांना एक कोटी रुपये द्यायला सांग. नाही तर त्यांना बॉम्बने उडवून देऊ, असं धमकावणाऱ्याने तायडेंना सांगितलं. खंडणीसाठी धमकावणाऱ्याने केवळ फोनच केला नाही तर त्याच फोनवर धमकावणारा मेसेजही पाठवला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत एक कोटी रुपये द्या, नाही तर बॉम्ब ब्लास्ट करू, अशी धमकी यावेळी देण्यात आली होती, अशी माहिती तायडे यांनी दिली. धमकी देणारा हिंदीत बोलत होता, असंही त्यांनी सांगितलं. यानंतर आलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, ५ बजे तक १ करोड भेज दे, महाजनको बोल दे, नाही तो बहोत बडा ब्लास्ट हो जाएगा, मालेगांव में मेरे आदमी खडे है, नाही तो तुम्हारी मर्जी मेरा काम करके निकाल जाऊंगा.

दरम्यान, तायडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ३८४, ३८५, ५०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे तपास करीत आहेत. धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी महाजन यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच त्यांनी कुणावरही संशय व्यक्त केला नाही. घटनेनंतर घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक संशयिताची कसून तपासणी केली जात होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER