काबूलच्या लग्नसमारंभात भीषण बॉम्बस्फोट, ४० जणांचा मृत्यू

bomb blasts 40 killed-kabul-wedding

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये शनिवारी रात्री एका लग्नसमारंभात घडवून आणलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात ४० जणांचा मृत्यू झाला असून, १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमधील पश्चिमेकडील दुबई शहरात एका लग्न समारंभादरम्यान हा बॉम्बस्फोट झाला. यावेळी हॉलमध्ये लग्न समारंभासाठी एक हजारहून अधिक लोक हजर होते. तसेच, या परिसरात अल्पसंख्यक शिया हजारा समुदायाचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात.

अफगानिस्तानच्या गृहमंत्रालयाने सांगितले की, हा आत्मघाती हल्ला शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार साडेदहा वाजताच्या सुमारास झाला. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. त्यामुळे या हल्ल्यामागे कोणाचा कट आहे, याबाबत काहीच सांगता येणार नाही, असे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्या नुसरत रहीमी यांनी सांगितले.

हल्लेखोराने लग्न समारंभावेळी जास्त लोक हजर असताना स्फोटघडवून आणला. हा स्फोट लग्नाच्या स्टेजजवळ केला, त्याठिकाणी म्युजिशियन उपस्थित होते, असेही नुसरत रहीमी यांनी सांगितले. तर, एका प्रत्यक्षदर्शीने दावा केला की, या बॉम्बस्फोटात अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.