उसेन बोल्ट म्हणतो, रोनाल्डो माझ्यापेक्षाही जलद धावू शकतो!

Usain Bolt - Christiano Ronaldo

भूतलावरील सर्वांत जलद धावपटू, जमैकाचा (Jamaica) उसेन बोल्ट (Usain Bolt) ह्याच्या वेगाशी नेहमीच इतरांची तुलना होत असते. कुणीही वेगाने धावल्याचा दावा केला तर तू स्वतःला उसेन बोल्ट समजतो की काय, आता काय बोल्टला हरवशील काय? अशा कॉमेंट होत असतात; पण या उसेन बोल्टला स्वतःला असे वाटते की, एक खेळाडू त्याच्यापेक्षाही जलद धावू शकतो. विशेष म्हणजे तो खेळाडू धावपटू (स्प्रिंटर) नाही तर फुटबॉलपटू आहे आणि तो खेळाडू म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo), पोर्तुगाल व युवेंटसचा स्टार फाॕरवर्ड.

१०० मी. अंतर फक्त ९.५८ सेकंदांत धावण्याचा विश्वविक्रम उसेन बोल्टच्या नावावर आहे; पण एका मुलाखतीत त्याने म्हटलेय की, आता जर त्याच्यात आणि रोनाल्डोमध्ये शर्यत झाली तर रोनाल्डो त्याच्याआधी अंतिम रेषा पार करेल. बोल्टच्या मते रोनाल्डो न चुकता दररोज करत असलेला सराव हे याचे कारण आहे. दुसरीकडे उसेन बोल्टचा २०१७ मधील निवृत्तीनंतर सराव सुटलेला आहे आणि तो केवळ स्वतःला फिट राखण्याइतपत सराव करत असतो. मी स्वतःला फिट ठेवण्याइतपत केवळ जिममधलाच व्यायाम करतोय आणि मला त्याची काही कमीसुद्धा जाणवत नाही, असे त्याने न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. म्हणून आताच्या परिस्थितीत शर्यत झाली तर रोनाल्डो आपल्याला हरवू शकतो, असे त्याने म्हटले आहे. तो सुपर ऍथलिट आहे. दररोजचा त्याचा सराव आहे, त्याच्या खेळात तो नेहमीच स्वतःला टॉपला ठेवतो, खूप मेहनत घेतो आणि तो लक्ष्यकेंद्रित आहे म्हणून तो माझ्यापेक्षा जलद धावू शकेल, असे बोल्ट म्हणतो.

बोल्टप्रमाणेच आणखी एक धावपटू अँजेल डेव्हिड राॕड्रिग्ज यानेसुद्धा हेच म्हटलेय. त्याच्या मते रोनाल्डो १०० मीटरचे अंतर १२ सेकंदांपेक्षा कमी वेळेत कापू शकतो.

राॕड्रिग्जने स्वतः रोनाल्डोच्या भन्नाट वेगाचा अनुभव घेतला आहे. २०११ मध्ये तो रोनाल्डोसोबत धावला होता. २५ मीटरचेच ते अंतर होते; पण ते राॕड्रिग्जने ३.३१ सेकंदांत तर रोनाल्डोने ३.६१ सेकंदात कापले होते. त्यावरून राॕड्रिग्जने गणित करून रोनाल्डो हा १०० मीटरचे अंतर ११.६ सेकंदांत कापू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER