जागतिक महिला दिनानिमित्त बॉलिवूडमधील गाजलेले नायिकाप्रधान सिनेमे

women oriented hindi movie for international women's day

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ‘गंगुबाई काठियावाडी’ बनून आता लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा सिनेमा कामाठीपुऱ्यातील कुख्यात लेडी डॉन गंगुबाईच्या जीवनावर आधारित आहे. आलियाने यापूर्वी ‘राजी’ सिनेमात पाकिस्तानात जाऊन भारतासाठी हेरगिरी करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. मात्र आलियाच्या ‘गंगुबाई’विरोधात आज दुपारी कामाठीपुरा येथे आंदोलन केले जाणार आहे. या सिनेमात कामाठीपुऱ्याची बदनामी होत असल्याचा असा पवित्रा कामाठीपुरा की आवाज संस्थेने घेतला आहे. मात्र असे असले तरी आजचा आपला विषय जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये तयार होणारे नायिकाप्रधान सिनेमे हा असल्याने या आंदोलनाची दखल आपण नंतर घेऊ. बॉलिवूडमध्ये ज्याप्रमाणे नायिकांना फक्त शोपीस म्हणून दाखवले जाते तसेच काही अत्यंत उत्कृष्ट असे नायिकाप्रधान सिनेमेही तयार झालेले आहेत. नारीशक्ती दाखवणारे हे सिनेमे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेले आहेत. खरे तर असे अनेक सिनेमे असून त्या सगळ्यांची दखल घ्यायची म्हटल्यास लिखाणासाठी पाने अपुरी प़तील. त्यामुळे आपण मोजक्याच सिनेमांचा आढावा घेऊ.

या यादीत सगळ्यात वर असलेला सिनेमा आहे 1957 मध्ये आलेला ‘मदर इंडिया’. मेहबूब खान (Mehboob Khan) यांनी खरे तर अगोदर याच विषयावरील ‘औरत’ सिनेमा तयार केला होता. पण तो म्हणावा तसा यशस्वी झाला नव्हता. म्हणून त्यांनी ‘मदर इंडिया’ची योजना आखली. भारतातील स्त्रिया कशा कणखर असतात ते या सिनमातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. पती निधनानंतर वखवखलेल्या नजरेने पाहाणाऱ्यांचा सामना करून, शेतात काबाडकष्ट करून दोन मुलांना एक आई कशी वाढवते आणि शेवटी गुंडगिरीकडे वळलेल्या मुलाला गोळी घालून ठार मारायलाही मागेपुढे पाहात नाही. प्रेक्षकांना नर्गिसची (Nargis) ही मदर इंडिया खूपच आवडली होती.

त्यानंतर 1977 मध्ये प्रख्यात अभिनेत्री हंसा वाडकर (Hansa Wadkar) यांच्या जीवनावर आधारित सिनेमा ‘भूमिका’ आला होता. स्मिता पाटील (Smita Patil) यांनी या सिनेमात हंसा वाडकर यांची भूमिका साकारली होती. हंसा वाडकर यांचे चरित्र कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी उत्कंठावर्धक नाही. त्यामुळेच त्यांच्या जीवनावर हा सिनेमा तयार झाला आणि स्मिता पाटील यांनी हंसा वाडकर यांच्या भूमिकेला पुरेपूर न्याया दिला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता.

 

1993 मध्ये राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांनी ‘दामिनी’ सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर केला होता. दामिनीची भूमिका साकारली होती मीनाक्षी शेषाद्रीने. (Minakshi Sheshadri) या भूमिकेसाठी फक्त मीनाक्षीच नव्हे तर या सिनेमात वकिलाची भूमिका साकारणाऱ्या सनी देओलला अभिनयाच्या राष्ट्रीय पुरस्कारासह विविध पुरस्कार मिळाले होते. सासरच्या नातेवाईकांनी एका मुक्या मुलीवर अत्याचार केल्यानंतर त्यांना शिक्षा देण्यासाठी सासरच्या मंडळींविरोधात दामिनी उभी राहाते. आणि अक्षरशः जीवावर खेळून त्या मुलीला न्याय मिळवून देते. प्रेक्षकांनी या सिनेमाला उचलून धरले होते.

यानंतर आपण उल्लेख करू शेखर कपूर (Shekhar Kapoor) यांच्या बहुचर्चित ‘बँडिट क्वीन’ सिनेमाचा. चंबळेच्या खोऱ्यात फूलनदेवी नावाची एक अत्यंत क्रूर आणि दहशत माजवणारी डाकू होती. लहानपणी तिच्यावर अत्याचार झाल्याने तिने बदला घेण्यासाठी बंदूक हाती घेतली आणि ती एक कुख्यात डाकू झाली. अनेकांना तीने यमसदनी धाडले होते. शेखर कपूर यांनी अत्यंत वास्तववादी पद्धतीने फूलनदेवीचे आयुष्य या सिनेमात मांडले होते. सीमा विश्वासने (Seema Biswas) फूलनदेवीची भूमिका खूपच उत्कृष्टरित्या साकारली होती.

यानंतर आपण थेट येऊ विद्या बालन अभिनीत ‘कहानी’ सिनेमावर. 2012 मध्ये हा सिनेमा आला होता. एक गर्भवती महिला तिच्या पतीच्या मृत्यूचा बदला कसा घेते त्याची अत्यंत रोचक कथा या सिनेमात मांडण्यात आली होती. विद्या बालनने या सिनेमातील भूमिकेला खूपच चांगला न्याय दिला होता. शेवटच्या फ्रेमपर्यंत सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला होता. सुजोय घोषने सिनेमाचे दिग्दर्शन खूपच उत्कृष्टपणे केले होते.

2012 मध्येच ‘गुलाब गँग’ नावाचा एक सिनेमा आला होता. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडलाही होता. नावावरून हा सिनेमा गँगस्टरच्या जीवनावर आधारित असल्याचे वाटते, पण तसे नव्हते. पुरुषांकडून सतत केल्या जाणाऱ्या अत्याचाराविरोधात महिला आवाज उठवतात. एक महिला पुरुषी अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात करते. एवढेच नव्हे तर यासाठी अन्य महिलांनाही तयार करते. आणि तिने तयार केलेल्या महिलांच्या टोळीला गुलाब गँग म्हणून ओळखले जाते. जेथे महिलांवर अत्याचार होतो तेथे ही गँग धावत जात असे आणि पुरुषांना धडा शिकवत असे. गँग लीडरची भूमिका माधुरी दीक्षितने (Madhuri Dikshit Nene) साकारली होती.

या सिनेमांशिवाय बॉलिवूडमध्ये अजूनही काही नायिकाप्रधान सिनेमे तयार झालेले आहेत. यात विद्या बालनचा ‘द डर्टी पिक्चर’, राजकुमार संतोषीचा ‘लज्जा’, प्रियांका चोप्रा अभिनीत प्रख्यात महिला बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर आधारित ‘मेरी कोम’, राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’, सोनम कपूर अभिनीत ‘नीरजा’ या सिनेमांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER