2022 च्या तारखाही केल्या मोठ्या कलाकारांनी बुक

Bollywood news

2020 चे संपूर्ण वर्ष जगासाठी वाईट गेले. उद्योगधंदे बंद पडले. जगात मनोरंजनाचे एक महत्वाचे साधन असलेल्या सिनेसृष्टीलाही याचा फार मोठा फटका बसला. जवळ-जवळ वर्षभर मोठ्या कलाकारांना त्यांच्या महत्वाकांक्षी सिनेमांचे शूटिंग करता आले नाही तर जे सिनेमे अंतिम टप्प्यात होते ते प्रदर्शित होऊ शकले नाहीत. त्यामुळे 2021 मध्ये कोरोनाची लाट ओसरताच आणि सरकारने थिएटर सुरु करण्याची परवानगी दिल्याबरोबर बॉलिवूडमधील (Bollywood) सगळ्याच मोठ्या कलाकारांनी 2021 मधील तारखा आपल्या नावावर करून टाकल्या, गेले काही दिवस जवळ जवळ रोज नव्या-नव्या सिनेमाच्या रिलीजच्या तारखा जाहीर केल्या जात आहे. वर्षाला 52 शुक्रवार आहेत सिनेमे मात्र 100 च्या वर गेल्याने बॉक्स ऑफिसवर वॉर अटळ आहे. बॉलिवूडसाठी 2021 ला खऱ्या अर्थाने आता सुरुवात होत असतानाच कलाकारांनी पुढील वर्षीच्या म्हणजे 2022 च्या तारखाही बुक करण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण 2022 च्या दिवाळी आणि ख्रिसमच्या तारखाही मोठ्या कलाकारांनी आपल्या नाववार केल्या आहेत. 2022 मध्ये रिलीज होणाऱ्या अशा काही मोठ्या सिनेमांवर एक नजर-

2022 ची सुरुवात अक्षयकुमारचा (Akshay Kumar) करणार आहे. 6 जानेवारी रोजी अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ रिलीज केला जाणार आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित या सिनेमात अक्षयसोबत अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी आणि अभिमन्यु सिंह यांच्याही भूमिका आहेत. सिनेमात कृती सेनन आणि जॅकलीन फर्नांडीज नायिकांची जागा भरून काढणार आहेत. त्यानंतर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर यशराज फिल्म्स त्यांचा स्पाय यूनिर्व्हर्स सीरीजमधील सगळ्यात मोठा सिनेमा ‘पठाण’ रिलीज करणार आहे. शाहरुख खान (Shahrukh Khan) अभिनीत या सिनेमात जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून सलमान खान (Salman Khan) यात कॅमियो करणार आहे.

फेब्रुवारी 2022 च्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘एक व्हिलन’ या गाजलेल्या सिनेमाचा सीक्वेल ‘एक व्हिलन रिटर्न्स’ 11 फेब्रुवारी रोजी रिलीज केला जाणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत असून सोमवारपासूनच मुंबईत याचे शूटिंग सुरु करण्यात आले आहे. सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करीत असून सह निर्माता आहे विनोद भानुशाली. सिनेमाचे दिग्दर्शक मोहित सूरी करणार आहे. यशराज फिल्म्सही त्यांचा विक्की कौशल आणि मानुषी छिल्लर अभिनीत सिनेमा फेब्रुवारीमध्येच रिलीज करणार आहे.

मार्चमध्ये होळीच्या मुहुर्तावर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर (Shradhha Kapoor) यांचा लव रंजन दिग्दर्शित सिनेमा रिलीज केला जाणार आहे. खरे तर या सिनेमात अगोदर रणबीरच्या नायिकेच्या रुपात दीपिका पदुकोणला घेण्यात आले होते. परंतु काही कारणाने दीपिकाने माघार घेतली आणि तिच्या जागी श्रद्धा कपूरची वर्णी लागली. या सिनेमाचे नाव अजून नक्की करण्यात आलेले नाही.

बॉक्स ऑफिसवर खरी टक्कर एप्रिलमध्ये बघायला मिळणार आहे. 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीची सुट्टी असून 15 एप्रिलला गुड फ्रायडे आहे. त्यानंतर शनिवार, रविवार असे सलग चार दिवस सुट्टीचे मिळणार आहेत. हा मोठा विकेंड लक्षात घेऊन प्रभासने (Prabhaas) त्याचा महत्वाकांक्षी ‘सालार’ सिनेमा 15 एप्रिल रोजी रिलीज करण्याची घोषणा केली आहे. ‘सालार’सोबत निर्माता दिनेश व्हिजन वरुण धवन (Varun Dhavan) अभिनीत ‘भेडिया’ही 14 एप्रिल रोजी रिलीज केला जाणार आहे.

1 मे या महाराष्ट्र आणि कामगार दिनाची सुट्टी डोळ्यासमोर ठेऊन अजय देवगण (Ajay Dvgan) ने त्याचा ‘मे डे’ हा सिनेमा 29 एप्रिल रोजी रिलीज करणाार असल्याचे घोषित केले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अजय देवगण स्वतःच करणार असून यात तो अमिताभ बच्चनसोबत काम करताना दिसणार आहे. सिनेमाचे पहिले शेड्यूस नुकतेच पार पडले. ऑगस्टमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभर उत्सव साजरे केले जाणार आहेत. याच उत्सवाचा एक भाग म्हणून प्रभासने त्याचा महत्वाकांक्षी ‘आदिपुरुष’ 11 ऑगस्टला रिलीज केला जाणार आहे. रामायणावर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊत (Om Raut) करीत आहे. या सिनेमात सैफ अली रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचे शूटिंग जोरदारपणे मुंबईत सुरु करण्यात आले आहे.

महात्मा गांधी जयंतीचा मुहुर्त साधत हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याचा ‘फायटर’ सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. 30 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज केला जाणार असून यात हृतिकच्या नायिकेच्या रुपात दीपिका पदुकोण दिसणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे. दोन वर्षांपूर्वी सिद्धार्थसाठी गांधी जयंती लाभदायी ठरली होती. त्याने हृतिक आणि टायगर श्रॉफ अभिनीत ‘वॉर’ 2 ऑक्टोबर 2019 ला रिलीज केला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींच्या उड्या मारल्या होत्या.

दोन दिवसांपूर्वी रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) त्याच्या महत्वाकांक्षी ‘अॅनिमल’ सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज केला. एवढेच नव्हे तर त्याच्या रिलीजची डेटही जाहीर केली. दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी त्याचा अॅनिमल हा बहुचर्चित सिनेमा फायटरच्या रिलीजनंतर एक आठवड्याने म्हणजे 9 ऑक्टोबरला रिलीज करणार आहे. या सिनेमात रणबीर कपूरसोबत अनिल कपूर, बॉबी देओल आणि परिणीति चोप्रा दिसणार आहेत.

2022 चा दसरा, दिवाळी आणि ख्रिसमसला रिलीज होणाऱ्या सिनेमांच्या नावाचीही आठ-दहा दिवसात घोषणा केली जाणार असल्याचे बॉलिवूडमध्ये मह्टले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER