बॉलिवूडमध्ये सेटवरील आगीचाही मोठा इतिहास

Salman Khan - Mother India

प्रख्यात दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) याने त्याच्या महत्वाकांक्षी ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमाच्या शूटिंगला मंगळवारपासून मुंबईत सुरुवात केली. रामायणाच्या महाकाव्यावर आधारित या सिनेमात प्रभास (Prabhas) रामाच्या आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. गोरेगाव येथे सिनेमाचा भव्य सेट लावण्यात आला होता. पण पहिल्याच दिवशी सेटवर आग लागली आणि सेटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात अग्निशमन दलाचा एक कर्मचारी गंभीर जखमीही झाला. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. ‘आदिपुरुष’च्या सेटला लागलेल्या या आगीने बॉलिवूडमध्ये (Bollywood) यापूर्वी सेटला लागलेल्या आगींची आठवण ताजी झाली. बॉलिवूडमध्ये संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali) आगीच्या बाबतीत अनलकी आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमाच्या सेटवर आग लागलेली आहे. इन्श्युरन्स मिळावा म्हणूनही आग लावली जात असे असेही बॉलिवूडमध्ये दबक्या आवाजात म्हटले जात असे. जाऊ दे. तो एक वेगळाच विषय आहे.

महबूब खान (Mehboob Khan) यांच्या मदर इंडिया सिनेमाच्या सेटवरील आग सगळ्यांनाच ठाऊक आहे. या आगीत प्रख्यात अभिनेत्री नर्गिस (Nargis) यांचा जीव धोक्यात आला होता. पण सुनिल दत्त (Sunil Dutt) यांनी प्रसंगावधान दाखवून नर्गिस यांना आगीतून वाचवले. सिनेमात आई-मुलाची भूमिका करणारे नर्गिस आणि सुनिल दत्त या आगीनंतर पती-पत्नी झाले. सिनेमात आगीत सापडलेल्या नर्गिस यांना मुलगा सुनिल दत्त वाचवतो असे एक दृश्य होते. सेटवर आग पसरू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. एका ठिकाणी आग लावून त्याच्या ज्वाळांमध्ये नर्गिस सापडल्याचे दाखवण्यास सुरुवात झाली. पण गवताच्या पेंड्या आजूबाजूला असल्याने आग अचानक भडकली आणि नर्गिस त्या आगीत सापडल्या. तेव्हा सुनिल दत्त यांनी एक ब्लँकेट घेऊन ते नर्गिस यांच्या अंगावर टाकले आणि त्यांना आगीतून बाहेर काढले. यात सुनिल दत्त थोडे जखमी झाले होते.

सुरुवातीलाच मी संजय लीला भंसाळी यांच्या सेटवरील आगीचा उल्लेख केला आहे. भंसाळी 1999 मध्ये हम दिल दे चुके सनम सिनेमाला सुरुवात केली होती. या सिनेमात सलमान खान (Salman Khan), ऐश्वर्या (Aishwarya) आणि अजय देवगण (Ajay Devgan) यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमाचा भव्य सेट मुंबईतील फिल्मसिटीत लावण्यात आला होता. या सेटला एकदा आग लागली. शूटिंग सुरु नसल्याने सुदैवाने सेटवर जास्त कोणी उपस्थित नव्हते. या आगीत सेटचेच नुकसान झाले होते.

यानंतर संजय लीला भंसाळीने देवदास सिनेमाला सुरुवात केली होती. शाहरुख खान आणि ऐश्वर्या अभिनीत या सिनेमाच्या सेटवरही एकदा भयंकर आग लागली होती. या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला होता आणि सेटचेही नुकसान झाले होते.

यानंतर संजय लीला भंसाळी यांनी आगीची हॅटट्रिक केली होती. 2004 मध्ये त्यांनी ब्लॅक सिनेमाला सुरुवात केली होती. यात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukherjee) यांच्या मुख्य भूमिका होत्या. मुंबईत या सिनेमाचा भव्य सेट लावण्यात आला होता. एक दिवस या सेटला भयानक आग लागली आणि त्यात सगळी उपकरणे जळून गेली. विशेष म्हणजे आग लागली त्या दिवशी शूटिंग सुरु नव्हते आणि सेटवरही मोजकेत कामगार उपस्थित होते. आगीत काही जणांना मामूली जखमा झाल्या, सेटचे मात्र मोठे नुकसान झाले होते.

2012 मध्ये मुंबईतील मेहबूब स्टूडियोमध्ये सलमान खानच्या ‘दबंग 2’ (Dabangg) सिनेमाचा भव्य सेट लावण्यात आला होता. सेटवर ब्रेकच्या काळात शॉर्ट सर्किट झाले आणि आगीचा भडका उडाला. सुदैवाने सलमान व्हॅनिटी व्हॅनमध्ये असल्याने बचावला. मात्र या आगीत तीन जण गंभीररित्या जखमी झाले होते.

2013 मध्ये वरुण धवन (Varun Dhawan) त्याच्या ‘मैं तेरा हीरो’ सिनेमाचे शूटिंग बँकॉकमध्ये करीत होता. यासाठी सेटही लावण्यात आला होता. कलाकारांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या व्हॅनिटी व्हॅनच्या जनरेटला आग लागली आणि ती सेटपर्यंत पोहोटली होती. या आगीत अनेक जण बेशुद्ध पडले सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

वरुण धवन आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) अभिनीत रेमो डिसूझा (Remo D’Souza) दिग्दर्शित ‘एबीसीडी 2’ (ABCD 2) च्या सेटवर मोठी आग लागली होती. एका गाण्याचे शूटिंग सुरु होते. यासाठी मुख्य कलाकारांसह 500 ते 600 बॅक स्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ आणि बॅकग्राऊंड डांसर सेटवर उपस्थित होते. शूटिंग सुरु असताना अचानक आग लागली आणि सेटवर एकच पळापळ सुरु झाली. सर्व कलाकार आणि 600 जणांना सेटवरून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्याने मोठी प्राणहानी टळली होती.

टीव्ही मालिकांच्या सेटवर आग लागण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. पण संजय खान यांच्या ‘द स्वोर्ड ऑफ टीपू सुलतान’ च्या सेटवर लागलेली आग भीषण होती. सेटवर ते 50 ते 60 जणांचा क्रू उपस्थित होता. या आगीत टिपू सुलतानची भूमिका करणारे संजय खान स्वतः जवळ जवळ 65 टक्के भाजले होते. या आगीमुळे त्यांचा चेहरा भाजला गेल्याने त्यांच्यावर 73 ऑपरेशन करण्यात आले. या आगीतून अभिनेत्री नीना गुप्ता मात्र सुदैवाने वाचली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER