यशस्वी उद्योजक झालेल्या बॉलिवूडच्या नायिका

Bollywood actresses who have become successful entrepreneurs

बॉलिवूडमध्ये (Bollywood) प्रचंड पैसा आहे. कलाकार कोट्यावधींनी पैसे कमवत असतात. जुन्या काळीही कलाकार पैसे कमवत असत पण ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवून भविष्याची तरतूद करण्याची गरज त्यांना वाटत नसे. पैसे कसेही उधळत असत आणि आयुष्याच्या शेवटी कंगाल होत असत. अशी अनेक उदाहरणे आहेत. पण 80 च्या दशकापासून मात्र कलाकारांनी भविष्याची तरतूद करून सिनेमातून मिळालेला पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवून भविष्याची तरतूद केलेली दिसते. अर्थात जुन्या काळातही असे काही हुशार कलाकार होतेच. नायक गुंतवणूक करीत असले तरी नायिका मात्र व्यवसायापासून दूर राहात. तो आपला प्रांत नाही असे त्यांना वाटत असे. पण आताच्या नायिका हुशार तर झाल्या आहेतच, एवढेच नव्हे तर आपण उत्कृष्ट व्यावसायिकही आहोत हेसुद्धा त्यांनी दाखवून दिले आहे. आज याची आठवण येण्याचे कारण म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्राचे (Priyanka Chopra) रेस्टॉरन्टच्या व्यवसायात पाऊल टाकणे हे आहे.

प्रियांका चोप्राने अभिनय करतानाच सिने निर्मितीलाही सुरुवात केली होती आणि आता तिने न्यूयॉर्कमध्ये भारतीय व्यंजने देणारे रेस्टॉरंट सुरु केले असून त्याचे नाव ‘सोना’ ठेवले आहे. पति निक जोनाससोबत प्रियांकाने नुकतीच या हॉटेलमध्ये पूजा केली. हे हॉटेल लवकरच सुरु होणार आहे. मात्र बॉलिवूडमध्ये व्यवसायात उतरणारी प्रियांका ही काही पहिलीच नायिका नाही. अशा अनेक नायिका असून प्रियांकाच्या निमित्ताने अशा व्यावसायिक नायिकांवर एक नजर टाकूया.

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सिनेमातून काम मिळणे कमी झाल्यानंतर शिल्पाने रेस्टॉरंटच्या व्यवसायात उडी मारली होती. शिल्पाने आयपीएलमध्ये उडी घेऊन ‘राजस्थान रॉयल्स’ ही टीम विकत घेतली होती. एवढेच नव्हे तर शिल्पाचा स्पा आणि बारचाही व्यवसाय आहे. याशिवाय ती योगाही शिकवत असते. दोन-तीन महिन्यांपूर्वीच शिल्पाने वरळीत ‘बेस्टियन चेन’ नावाने नवीन रेस्टॉरंट सुरु केले आहे.

मिस यूनिव्हर्स झाल्यानंतर सुष्मिता सेनने (Sushmita Sen) बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. काही हिट सिनेमे तिने दिले पण नंतर तिची जादू ओसरली. गेल्या वर्षी बऱ्याच काळानंतर सुष्मिता ‘आर्या’ या वेबसीरीजमध्ये दिसली होती. यातील तिच्या कामाची प्रशंसाही झाली होती. मात्र सिनेमात काम कमी झाल्यानंतर सुष्मिताने ज्वेलरी बिझनेस सुरु केला होता. सुष्मिताचे दुबईत ज्वेलरी स्टोअर्स आहेत. सध्या हा व्यवसाय तिची आई सांभाळत आहे. याशिवाय सुष्मिताने स्वतःची निर्मिती संस्था ‘तंत्र एंटरटेनमेंट’ही सुरु केली आहे. याशिवाय सुष्मिताचे मुंबईत एक रेस्टॉरंट असून तेथील बंगाली डिशेस खूपच लोकप्रिय आहेत.

सोनम कपूरने (Sonam Kapoor) बॉलिवूडमध्ये एंट्री केली पण तिचे अभिनयापेक्षा तिचे जास्त लक्ष फॅशनकडे आहे. त्यामुळेच सोनमने बहिण रिया कपूरसोबत फॅशनेबल कपड्यांचा व्यवसाय सुरु केला. तिच्या फॅशन ब्रँडचे नाव रीहसोन (RHESON) असे ठेवण्यात आलेले आहे. हे नाव दोन्ही बहिणींच्या नावाची आद्याक्षरे घेऊन तयार करण्यात आलेले आहे. या ब्रँडअंतर्गत डिझायनर कपडे, ज्वेलरी आणि फूटवेअरची निर्मिती केली जाते. सोनमचा हा व्यवसाय खूपच चालत आहे.

80 च्या दशकात आघाडीची अभिनेत्री असलेल्या करिश्मा कपूरनेही (Karisma Kapoor) सिनेमातील काम कमी झाल्यानंतर कपड्यांच्या स्टोअरमध्ये गुंतवणूक केली. लहान मुलांचे कपडे आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंचा व्यवसाय करिश्मा करीत असून हा व्यवसाय खूपच यशस्वी आहे.

मिस यूनिव्हर्स लारा दत्तानेही (Lara Dutta) सिनेमात काम करीत असतानाच साड्यांचा ब्रॅन्ड लाँच केला होता. यासाठी लाराने साड्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या ब्रॅन्ड छाब्रा 555 शी टायअप केले. याशिवाय लाराने परफ्यूम व्यवसायही सुरु केला. एवढेच नव्हे तर तिने ‘भीगी बसंती’ नावाने प्रोडक्शन हाऊसही सुरु केले आहे.

एकेकाळची अभिनेत्री आणि आता अक्षयकुमारची पत्नी असलेली ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) वर्तमानपत्रात कॉलम लिहित असते. ती एक लेखिका असून तिने ‘मिसेस फनी बोन्स’ आणि ‘द लीजंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ ही पुस्तके लिहिली आहेत जी प्रचंड लोकप्रिय झाली. याशिवाय ती इंटेरियर डिझायनिंगच्या क्षेत्रातही आहे. याशिवाय ट्विंकल सिनेनिर्मितीच्या क्षेत्रातही उतरली असून तिने अक्षय कुमारच्या सुपरहिट ‘पॅड मॅन’ सिनेमाचीही निर्मिती केली आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma) काही वर्षांपूर्वी नुश (Nush) नावाने कपड्यांची श्रेणी सादर करून कपड्यांच्या व्यवसायात पदार्पण केले होते. याशिवाय भावासोबत अनुष्काने ‘क्लीन स्लेट फिल्म’ ही निर्मिती संस्थाही सुरु केली आहे. या कंपनीअंतर्गत अनुष्का सिनेमा आणि वेबसीरीजची निर्मिती करते.

पोर्न स्टार असलेल्या सनी लियोनीने (Sunny Leone) बॉलिवूडमध्ये प्रवेश करून अत्यंत कमी वेळात चांगलेच यश मिळवले. याच सनीने देशातील पहिले ऑनलाईन अॅडल्ट स्टोर आयएमबेशरम डॉट कॉम (IMbesharm.com) 2013 मध्ये सुरु केले. या स्टोअरमध्ये सेक्स टॉय, सेक्सी कॉस्ट्यूम, स्वीमवेअर आणि पार्टी वेअर कॉस्ट्यूमची विक्री केली जाते. भारतातील हे पहिले अधिकृत अॅडल्ट वस्तूंचे ऑनलाईन स्टोअर आहे.

दीपिका पदुकोणनेही (Deepika Padukone) स्वतःचा कपड्यांचा व्यवसाय सुरु केला आहे. 2015 मध्ये मिंत्रासोबत तिने ‘ऑल अबाउट यू’ ब्रँडची सुरुवात केली. दीपिकाने त्यापूर्वीही म्हणजे 2013 मध्ये प्रख्यात ब्रॅन्ड ‘व्हॅन हुसेन’सोबत महिलांसाठी फॅशन लाईन सुरु केली होती.

तरुण अभिनेत्री आलिया भट्टनेही (Alia Bhatt) व्यवसायात पाऊल टाकल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले होतेच. 2013 मध्ये आलियाने क्रॅकर नावाने एका फॅशन ब्रँडच्या स्टार्टअपची सुरुवात केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी आलियाने एड-ए- मम्मा (Ad-E-Mamma) नावाने एक कंपनी सुरु केली. हा 4 ते 12 वयोगटातील लहान मुलांच्या कपड्यांचा ब्रँड आहे. याशिवाय आलियाने प्रोडक्शन कंपनीही सुरु केली असून शाहरुखसोबत सिने निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे.

परदेशातून बॉलिवूडमध्ये येऊन कॅटरीना कैफने (Katrina Kaif) प्रचंड यश मिळवले. कॅटरीना एक चांगली अभिनेत्री तर आहेच, ती एक चांगली व्यावसायिकही आहे. 2019 मध्ये तिने ‘के ब्यूटी’ (Kay Beauty) नावाने एक ब्रँड लाँच केला. यासाठी तिने मेकअप ब्रँड नायका (Nykaa) सोबत टायअप केले आहे. तिचा हा ब्रँड प्रचंड लोकप्रिय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER