रत्नागिरीत शिवभोजन योजनेत बोगस लाभार्थी आढळले; जिल्हा शासकीय रूग्णालयातील प्रकार

Shivbhojan

रत्नागिरी(प्रतिनिधी): दहा रुपयात जेवणाची जोरदार जाहिरात करून झोकात उदघाटन केलेली शिवसेनेची शिवभोजन थाळी योजना उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी बोगस लाभार्थी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयात हा प्रकार घडला आहे. ठेकेदाराचे कामगारच या योजनेचे लाभार्थी म्हणून समोर आल्याने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली असून, अन्न नागरी पुरवठा खात्याकडून याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाविकास आघाडीने निवडणुकीदरम्यान ‘दहा रूपयात भरपेट जेवण’ ही घोषणा केली होती. त्यानुसार प्रजासत्ताक दिनी रत्नागिरीमध्ये झोकात शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला. रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालय, रेल्वे स्टेशन, एस्. टी. स्टॅण्ड आणि हॉटेल मंगला येथे ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, शुभारंभ केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या योजनेत बोगस लाभार्थी आढळले. या योजनेचा ठेका वाशी येथील डी. एम. एन्टरप्रायझेस या कंपनीला देण्यात आला आहे. या ठेकेदाराने नेमलेल्या कामगारांपैकी दोन महिला सोमवारी रांगेत उभ्या राहून कुपन घेत असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता, सुपरवायझरने आपणास रांगेत उभे राहण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितले. येथील सुपरवायझरने त्या दोघांची एंट्री रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर या प्रकरणाची दखल जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी घेतली असून, त्यांच्याकडून यादी घेतली जाईल. या यादीमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे लक्षात आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले. या प्रकरणाची अन्न नागरी पुरवठा खात्याने दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.