‘भविष्यात आघाडी सरकार कोसळल्यास त्याचा केंद्रबिंदू मुंबई महापालिकाच असणार’

Shiv Sena - BMC - Congress

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसने मुंबई महापालिकेची (BMC) निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर शिवसेनेने (Shiv Sena) काँग्रेसवर (Congress) दबाव वाढवण्यास सुरूवात केली आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे त्यांची ताकद वाढत असल्यामुळे जुन्या मित्र पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईत ३० नगरसेवक असलेल्या काँग्रेसला शिवसेनेच्या मेहरबानीवर विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे, याची जाणीव करून देत शिवसेनेला त्यांना त्यांची जागा दाखवून रस्त्यांवर आणण्याचा प्रयत्न केल्याचे बालले जात आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील सरकार कोसळल्यास त्याचा केंद्रबिंदू मुंबई महापालिकाच ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेत मागील काही दिवसांपासून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात शाब्दिक चकमक घडताना दिसून येत आहे. सत्ताधारी पक्ष आता विरोधकांचे ऐकत नसून राज्यात असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाची दखलही शिवसेना न घेता आपल्याला विचारात घेत नसल्याने काँग्रेससह विरोधी पक्षांचे नेते प्रचंड नाराज आहेत. मागील स्थायी समितीच्या बैठकीत पहिला कोरोनाच्या खर्चाचा प्रस्ताव आणि त्यानंतर ताज हॉटेलला सवलतीच्या दरात रस्ता व पदपथाची जागा देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यावरून सत्ताधारी पक्ष व विरोधक यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. मात्र, जेव्हापासून काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाली आणि त्यांनी महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवून आपलाच महापौर बसेल, अशी घोषणा केली, तेव्हापासून शिवसेनेला त्यांनी वेगळ्याच नजरेने पहायला सुरुवात केली आहे.

विरोधी पक्षाला न जुमानता त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शिवसेनेने आपल्या मैत्रीतला ओलावा कायम राखत भाजपच्या गटनेत्याला विरोधी पक्षनेतेपदी बसवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. सन २०१७च्या निवडणुकीत ८४ नगरसेवक निवडून येवूनही भाजपने विरोधी पक्षनेतेपद न स्वीकारता पहारेकरी म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपला धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद बहाल केले. परंतु आता भाजपपेक्षा काँग्रेस डोकेदुखी ठरत असल्याने त्यांना बाजुला सारुन पहारेकऱ्यांना विरोधी पक्षनेतेपदी बसवण्याचा मार्ग निवडला जात आहे. भाजप पहारेकरी म्हणून विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडतच आहे. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिले तरी फारसा फरक पडणार नाही. मात्र, भाजपला विरोधी पक्षनेतेपद देवून काँग्रेसची नांगी ठेचता येईल. विरोधी पक्षनेतेपदाच्या बळावर काँग्रेस अंगावर गुरगुरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून हे पद काढून त्यांना कमकुवत बनवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे भाजपला (BJP) विरोधी पक्षनेतेपद दिल्यास पुढील काही महिने निवडणुकीला उरले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधाचा फारसा परिणाम होणार नाही. परंतु काँग्रेसला यामुळे अधिक मजबूत बनण्याची संधी राहणार नाही. त्यामुळे त्यांना या पदासाठी राज्यातील सरकाराला पाठिंबा द्यावा लागेल किंवा हे पद काढल्यानंतर निवडणुकीत जी स्वबळाची घोषणा केली आहे, त्यातील अस्तित्व टिकवण्यासाठी महायुतीसोबत निवडणुकीसाठी सहभागी होण्याची परिस्थिती निर्माण केली जाण्यासाठी ही सर्व चाल असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही विरोधी पक्षात असून त्यांना जर भाजपला हे पद द्यायचे असेल तर त्यांनी खुशाल द्यावे. आम्ही बाजुला व्हायला तयार आहोत. आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी स्वबळाची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे मुंबईत आम्ही सर्व जागा लढवणार आहोत. महायुती ही राज्यात आहे. मुंबई महापालिकेत नाही. त्यामुळे आम्ही घाबरत नाही. शिवसेना वेगळ्या नजरेतून काँग्रेसकडे पाहत असेल तर त्याचे परिणाम त्यांना दिसतील आणि भविष्यात सरकार पडलेच तर त्याला मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नेतेच जबाबदार असतील, असे राजा यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER