बेकायदा इमारत कोसळेपर्यंत बीएमसी ३०वर्षे  झोपून राहिली

डोंगरी दुर्घटनेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

Supreme Court & BMC

मुंबई : स्वत:ला कार्यक्षम म्हणविणारी बृहन्मुंबई महानगरपालिका शहरातील बेकायदा इमारत कोसळून माणसे मरेपर्यंत झोपून राहिली, असे तिखट ताशेरे ओढत या दुर्घटनेच्या संदर्भात पोलिसांनी अटक केलेल्या इमारत मालकास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जामीन मंजूर केला.

बाई केसरबाई धरमशी खाकू चॅरिटेबल अ‍ॅण्ड रीलिजियस ट्रस्टच्या मुंबईत डोंगरी येथे अनेक जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. यापैकी पाचव्या  क्रमांकाच्या इमारतीचा बेकायदा बांधकाम करून वाढविलेला भाग गेल्या वर्षी १६ जुलै रोजी कोसळून पाच पुरुष तीन महिला व पाच लहान मुले अशा १३ जणांचा मृत्यू झाला होता. शिवाय आणखी नऊ रहिवासी जखमी झाले होते. इमारतीत हे बेकायदा बांधकाम सन १९९० ते ९३ दरम्यान केले गेले होते. इमारत उपकरप्राप्त (Cessed Building) असल्याने खरं तर जीर्ण होऊन पडायला आलेल्या या इमारतीच्या दुरुस्तीची जबाबदारी ‘म्हाडा’ची आहे. पण इमारतीत बेकायदा बांधकाम झाले आहे, असे म्हणून ‘म्हाडा’ने हात वर केले होते.

दुर्घटनेत ज्याचा भाऊ व पुतणी वारली अशा एका रहिवाशाने केलेल्या फिर्यादीवरून डोंगरी पोलिसांनी इमारतीची मालकी असलेल्या ट्रस्टचे एक माजी ट्रस्टी अली अकबर श्रॉफ यांना अटक केली. त्यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. संजय कृष्ण कौल, न्या दिनेश माहेश्वरी व न्या. हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने ‘बीएमसी’, पोलीस व ‘म्हाडा’च्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी नोंदविली. इमारत कोसळली तेव्हा ट्रस्टी नसलेल्या व तपासात पूर्ण सहकार्य दिलेल्या श्रॉफ यांना आरोपपत्र दाखल करताना पोलिसांनी का अटक केली हे अनाकलनीय आहे, असे न्यायालयाने म्हटले. अटक केलेल्या इतर दोन ट्रस्टींना वृद्धत्वामुळे याआधीज अंतरिम जामीन मिळाला आहे. दोन ट्रस्टींचे निधन झाले आहे तर एका ट्रस्टीला अटकच झालेली नाही.

मुंबईत प्रत्येक पावसाळ्यात अशा दुर्घटना होऊन मोठी प्राणहानी होते यावर खेद आणि उद्वेग व्यक्त करत या प्रकरणातील इमारतीच्या संदर्भात म्हटले की, ज्यांनी अनधिकृत बांधकामांविरुद्ध वेळीच तत्परतेने कारवाई करायला हवी अशा अनेक संस्थांनी ती न केल्याने ही दुर्घटना घडली हे उघड आहे. जे घडले त्याबद्दल कर्तव्यकसूरी केलेल्या अधिकाºयांवर काही कारवाई केली जाईल याविषयीही आम्हाला शंका आहे. अजून तपास संपलेला नसल्याने पोलीस आतात तरी यादृष्टीने पावले उचलतील,अशी आशा आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER