सोमवारच्या पावसाने मनपाचा नालेसफाईचा दावा ठरवला फोल; नगरसेवकांचा आरोप

मुंबई : चक्रीवादळामुळे मुंबईत सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसाने (Heavey Rain) मनपाचा (BMC) नालेसफाईचा दावा फोल ठरवला आहे. हवामान खात्याने इशारा दिला असतानाही पूर्वतयारीत महापालिका अपयशी ठरली. पावसाळापूर्व कामांचाही फज्जा उडाल्याने या प्रकरणाची चौकशी करून दोषींविरुद्ध कडक कारवाई करा, अशी मागणी नगरसेवकांनी (Corporators) केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने मुंबईमधील नाल्यांच्या साफसफाईचे काम केले. मोठ्या नाल्यांच्या सफाईचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. मात्र सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसाने हा दावा खोटा ठरवला.

मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारांना कामे देण्यात आली आहेत. कंत्राटदारांनीही कामे सुरू केली असून आतापर्यंत ८० टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी काही दिवसांपूर्वी नालेसफाईच्या कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले होते. आतापर्यंत लहान नाल्यांची साधारण १० ते १५ टक्केच सफाई पूर्ण झाली आहे. सोमवारी सकाळपासून कोसळलेल्या संततधार पावसामुळे सखल भाग जलमय होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली.

अनेक भागांतील नाले आणि गटारांतून पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. नाल्यांच्या आसपास राहणाऱ्या लोकांचे अतोनात हाल झाले. हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर मुंबई महापालिकेने सज्ज राहणे गरजेचे होते. पावसाळापूर्व कामात महापालिका अधिकाऱ्यांकडून अक्षम्य दिरंगाई झाली आहे. मलनिस्सारण व्यवस्थापन विभागातील (प्रचालन व परिरक्षण) जबाबदार अधिकारी सुस्त आहेत, असा आरोप समाजवादी पार्टीचे महापालिकेतील गटनेते रईस शेख यांनी केला. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button