मुंबई महापालिकेच्या कोविडच्या खर्चात ‘घोटाळा’ नाही?

Bombay Municipal Corporation BMC

मुंबई :- कोरोना विषाणूच्या (Corona Virus) उपाययोजनांसाठी करण्यात आलेल्या खर्चाबाबत महापालिका (BMC) स्थायी समितीच्या मागणीनुसार प्रमुख लेखापरिक्षकांच्या माध्यमातून या सर्व खर्चांची चौकशी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये ज्याप्रकारे स्थायी समिती व इतर राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून आरोप करण्यात आले, तसे भ्रष्टाचार किंवा घोटाळ्याचे प्रकार दिसून आले नाही, लवकरच याबाबतचा अहवाल स्थायी समितीला सादर केला जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीसह महापालिकेच्या कोणत्याही सभांचे कामकाज करता येणार नसल्याने खर्चांच्या मान्यतेला अडथळा येवू नये म्हणून प्रशासनाने खर्च करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्त व उपायुक्तांना दिले होते. १७ मार्च २०२० रोजी प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर केला. त्यामध्ये त्यांनी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना ५ ते १० कोटी रुपये, तसेच उपायुक्त रमेश पवार व पराग मसुरकर यांना एक ते पाच कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी मागितली होती. याला स्थायी समितीने मंजुरी देत आपत्कालिन प्रसंगी खर्च करण्याचे अधिकार या अधिकाऱ्यांना दिले. त्याअंतर्गत कोविड काळातील सर्व खर्च करण्यात आला.

खर्च केलेल्या कामांचे प्रस्ताव २१ ऑक्टोबर २०२० रोजीच्या स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आले. त्यावेळी पहिल्या बैठकीत ४९ प्रस्ताव सादर केले होते. त्यानंतरच्या पुढील बैठकीत अशाप्रकारचे प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंतचे सुमारे १२५ ते १५० कोरोना खर्चाचे प्रस्ताव सविस्तर अहवाल सादर करण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे फेरविचारासाठी पाठवण्यात आले आहेत. या कोविड कामातील खर्चामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप चारही बाजुंनी होत आहेत. त्यातच दोन महिने उलटत आले तरी यावरील सविस्तर माहितीसह प्रस्ताव पुन्हा समितीपुढे आणले जात नसल्याने संशय मोठ्या प्रमाणात बळावला आहे. त्यामुळे स्थायी समितीत विरोधी पक्षांच्यावतीने समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी प्रमुख लेखापरिक्षक यांच्या माध्यमातून यासर्व खर्चांच्या प्रस्तावाचे ऑडीट केले जावे, अशी मागणी केली गेली. याला विरोधी पक्षनेते रवी राजा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी पाठिंबा दिला. तसेच सभागृह नेत्यांसह सत्ताधारी पक्षानेही याला पाठिंबा दिल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी या सर्व प्रस्तावांचे ऑडीट करण्याचे निर्देश लेखापरिक्षकांना दिले होते.

स्थायी समितीच्या निर्देशानुसार लेखापरिक्षकांच्या १२ ते १५ जणांच्या चमुने मध्यवर्ती खरेदी खात्याच्या कार्यालयात जावून खर्चाच्या या सर्व सुमारे १२५ फाईल्सची तपासणी केली. या तपासणीमध्ये अधिकाऱ्यांना ज्या वस्तूंचा हिशोब जुळत नव्हता, त्याची विचारणाही केली. त्यानंतर त्या हिशोबाची तसेच कशाप्रकारे आणि कुणाच्या परवानगीनंतर याची खरेदी केली गेली याचीही माहिती देण्यात आली. सर्व खरेदी करण्यात आलेल्या वस्तू आणि केलेल्या खर्चाची विस्तृत माहिती लेखापरिक्षकांच्याा चमुला सादर करण्यात आल्यानंतर त्यांना यामध्ये काहीही त्रुटी किंवा गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले नसल्याची माहिती मिळत आाहे.

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, स्थायी समितीच्या निर्देशानतर दुसऱ्याच दिवशी लेखापरिक्षकांचे पथक दाखल झाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचे पथक पाठवून केलेली ही पहिलीच वेळ आहे. परंतु यामध्ये त्यांना काहीही सापडले नाही. ही सर्व खरेदी किंवा केलेला खर्च हा आपत्कालिन अ‌ॅक्टच्या अधिन राहून केलेला आहे. विशेष म्हणजे ही खरेदी करताना जी स्क्रुटीनी कमिटी आहे त्यामध्ये तांत्रिक तज्ज्ञ आहेत. शिवाय प्रस्तावातील खरेदीमध्ये कंत्राटदार किंवा कंपनीशी तडजोड करण्यासाठी जी समिती आहे, त्यामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह शासनातील सनदी अधिकारी दर्जाचा व्यक्ती आहे. एवढेच नाही तर त्यानंतर संमतीकरता ही समिती आहे, त्यामध्ये दोन अतिरिक्त आयुक्त व एक सहआयुक्त यांचा समावेश आहे. जर कमी किंमतीची बाब असेल तर यांच्या स्तरावरच मंजुरी दिली जाते. पण जास्त किंमतीची बाब असेल तर आयुक्तांची मंजुरी घेतली जाते. त्यामुळे प्रत्येक प्रस्ताव हा अतिरिक्त आयुक्त व आयुक्तांच्या मंजुरीनेच बनवण्यात आला असून त्यानुसारच त्याला परवानगी दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • कोविडकरता आतापर्यंतचा एकूण खर्च : १,६४४ कोटी रुपये
  • अतिरिक्त गरज : ४०० कोटी रुपये
  • सेव्हन हिल्ससह सात जम्बो कोविड केअर सेंटरवरील खर्च : २१३ कोटी रुपये
  • कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या कक्षेतील खर्च : १३० कोटी रुपये
  • अन्न पाकिटांचे वाटप : १३० कोटी रुपये
  • उपनगरीय रुग्णालये : ६२. ८९ कोटी रुपये
  • मुख्य रुग्णालये : १०४ कोटी रुपये
  • विशेष रुग्णालये : १४. १८कोटी रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER