शिवसेनेची मनपात बाउंसर्स नियुक्त करण्याची घाई

- आयुक्तांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली

Shiv Sena - Iqbal Chahal

मुंबई : बीएमसीचे (BMC) आयुक्त इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मनपाच्या स्थायी समितीने बाउंसर्स नियुक्त करण्याच्या ३२ कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली.

ही निविदा मंजूर करू नये, असा आदेश आयुक्त चहल यांनी दिला होता; पण अशी कोणतीही सूचना आमच्यापर्यंत आली नाही, असे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.

या योजनेला भाजपा (BJP), काँग्रेस (Congress), समाजवादी पार्टी असा सर्वांचा विरोध आहे. चर्चेशिवाय याला मंजुरी देण्यात आली, असा आरोप आहे. मात्र, आधी उल्लेख केल्यानुसार स्थायी समितीचे अध्यक्ष जाधव यांनी सर्व आरोप फेटाळताना म्हटले आहे की, आम्ही काहीही चूक केली नाही. आम्हाला याबाबत मनपाकडून काहीही कळवण्यात आले नव्हते. याबाबत एका वृत्तपत्राशी बोलताना मनपा आयुक्त चहल म्हणाले की, बाउंसर्सची सेवा देणारी ईगल सिक्युरिटी अँड पर्सोनल सर्व्हिसेस ही कंपनी शिवसेनेच्या काही नेत्यांना निःशुल्क सुरक्षा देते, असा आरोप झाल्यानंतर मी या निविदेबाबतची कागदपत्रे स्थायी समितीकडून परत बोलावण्याचा आदेश दिला होता.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी माहिती दिली की, या प्रक्रियेचा फेर आढावा घेण्याचा आदेश मी दिला होता. या योजनेत तीन वर्षांसाठी सुरक्षा रक्षक आणि अटेन्डन्टस घेण्यात येणार आहेत. हा सर्व व्यवहार २२२ कोटी रुपयांचा आहे. मनपाच्या सेवेत स्वतःचे साडेतीन हजार सुरक्षा गार्ड असताना आणखी सुरक्षा गार्ड करारावर घेण्याच्या या योजनेबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

समाजवादी पार्टीचे नगरसेवक राईस शेख यांनी आरोप केला की, ही योजना योजना फेर आढाव्यासाठी मागे घ्या, असे प्रशासनाने सांगितल्यानंतर स्थायी समितीने ती मंजूर केली!

विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नगरसेवक रवी राजा यांनीही आरोप केला की, या योजनेला मंजुरी देण्यासाठी यशवंत जाधव यांनी स्वतः दबाव आणला होता. त्यांनी मागणी केली की, सरकारने यात हस्तक्षेप करावा, अशी सूचना चहल यांनी करावी व ही निविदा रद्द करा, अशी सूचनाही सरकारला करावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER