मुंबईत अखेर उद्यापासून दारूची होम डिलिव्हरी सुरू

BMC-Home Delivery(Liquor)

मुंबई :देशात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. मात्र आता राज्यात काही व्यवहारांना शिथिलता देण्यात आली आहे . या पार्श्वभूमीवर मुंबईत अखेर उद्यापासून मद्याची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यातून कंटेनमेंट झोनला वगळण्यात आलं आहे.

मुंबई महापालिका आयुक्तांनी यासंदर्भातील आदेश काढले असून घरपोच मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. घरपोच मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली असली तरी दुकानं मात्र बंदच असणार आहेत. सोशल डिस्टंसिंगचं पालन होत नसल्यानं मद्याची दुकानं बंदच ठेवली जातील, असं आदेशात म्हटलं आहे. तसंच होम डिलिव्हरी करतानादेखील सोशल डिस्टंसिंगच्या सर्व नियमांचं पालन केलं जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

याआधी राज्यात कंटेनमेंट झोन वगळून सशर्त मद्यविक्रीची परवानगी देण्यात आली होती. मात्र यामुळे तळीरामांनी मद्याच्या दुकानांबाहेर एकच गर्दी करत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवला होता. त्यामुळे सरकारने त्वरित हे आदेश मागे घेत मुंबईत मद्याची दुकानं बंद करण्यात आली होती.

दरम्यान कंटेनमेंट झोन वगळता परवानाधारक विक्रेत्यांना सीलबंद बाटलीतील मद्य परवानाधारक ग्राहकांना त्यांच्या घराच्या पत्त्यावर देता येणार आहे, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. दुकानांतून मद्यविक्री करता येणार नाही. मद्यविक्रेते ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातूनही घरपोच मद्य देऊ शकतील. राज्य सरकार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जाईल, असे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER