रक्तदुष्टी : आयुर्वेदविचार

Blood

बऱ्याचदा रक्त चांगले आहे किंवा रक्त शुद्ध नाही असे ऐकण्यात वा सांगण्यात येते. एखादा त्वचाविकार असेल तर रक्तशुद्धीकर औषध दिले जाते. आयुर्वेदात शुद्ध रक्त मनुष्याला बल, वर्ण, सुख, उत्तम आयु देणारे सांगितले आहे. रक्ताची कमतरता असेल तर ताकद कमी होते, अशक्तपणा असतो. शरीराचा वर्णकांती प्रभा कमी झालेली दिसते. काम करण्याचा उत्साह, आनंद नसतो हे बऱ्याच वेळा आपण बघतो. त्यामुळे आहार रसातून जे रक्त उत्पन्न होते ते शुद्ध रक्त असणे आवश्यक आहे.

शुद्ध रक्त म्हणजे काय तर ज्या रक्ताचा वर्ण इंद्रगोप ( एक प्रकारचा किडा), लाल कमळ तसेच गुंजाफळाप्रमाणे असतो ते शुद्ध रक्त समजावे. ज्या व्यक्तीमध्ये कान, नेत्र, मुख, जीभ, ओष्ठ, हातापायाचे तळवे, नख, मूत्रेन्द्रीय रक्तवर्णी चमकणारे असतात. त्यांच्यात रक्ताचे बल वा सारता खूप चांगली असते. अशा व्यक्ती सुकुमार, बलवान, कष्ट सहन करणाऱ्या असतात. ऊन, गरमी, उष्णता यांना सहन होत नाही. रक्ताचे प्रमाण व रक्ताची गुणवत्ता दोन्ही चांगले असेल तर सर्वच अवयवांचे पोषण व मांसमेदअस्थिमज्जाशुक्र या सर्वच धातू चांगले बनतात.

गर्भावस्थेत बाळाचे पोषणसुद्धा आईच्या रक्तापासूनच होत असते. गर्भावस्थेत पौष्टिक आहार घ्यावा असे तज्ज्ञ सांगतात; कारण आहार जेवढा चांगला व पचणारा असेल रक्त चांगले तयार होते, रक्त वाहिन्यांद्वारे बाळापर्यंत हे शुद्ध रक्त पोहचते व बाळाचा विकास योग्य प्रकारे होतो.

रक्त कशामुळे दूषित होऊ शकते त्याची कारणे बघूया –

 • दूषित अस्वच्छ पद्धतीने बनविलेले जेवण घेणे. यातून आहाररसच दूषित तयार होतो व परिणामतः दूषित रक्त निर्माण होते.
 • अति मद्यपान, मादक पदार्थाचे सेवन.
 • जास्त प्रमाणात खारट, आंबट, तिखट पदार्थ खाणे. उदा. पाणीपुरी, चाट, लोणची भेळसारखे पदार्थ. दही जास्त किंवा अयोग्य पद्धतीने खाणे.
 • कुळीथ, उडीद, बटाटा, मुळा सतत खाणे.
 • विरुद्धाहार, अधिक भोजन, जेवण न पचताच पुन्हा जेवणे म्हणजेच भूक लागली नसेल तरी वारंवार खाणे.
 • अति क्रोध, उन्हात काम केल्याने रक्त कुपित होते.
 • जड द्रव जेवण केल्यानंतर दिवसा झोपणे.
 • शरद ऋतूमध्ये स्वाभाविकरीत्या रक्तदुष्टी होते. म्हणूनच या काळात पंचकर्म करावे.
 • अशी अनेक कारणे रक्तदुष्टीची सांगितली आहेत.
 • वेळीच कारणे दूर केली नाहीत वा ऋतूनुसार पंचकर्माद्वारे रक्तशुद्धी केली नाही तर अनेक दोष निर्माण होतात.
 • मुखपाक, नेत्ररक्तता, नाकातून-तोंडातून दुर्गंध, अति मासिक स्राव , रक्तस्राव, शिरशूल, गळ्यात जळजळ, त्वचाविकार

खाज, पुरळं, शीतपित्त, कुष्ठ इत्यादी. अशा अनेक तक्रारी उत्पन्न होतात. या विकारांची चिकित्सा त्यानुसार केली जाते. परंतु मूळ कारण रक्तदुष्टी दूर करणे व आहारविहारात बदल आवश्यक ठरतो. जलौकावचरण, सिरावेध हे अशुद्ध रक्त निर्हरणार्थ केल्या जातात.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER