
तरुणावस्थेपासून रजोनिवृत्ती (Menopause) पर्यंत दर महिन्याला पाळी येणे ही एक स्वाभाविक नैसर्गिक क्रिया आहे. यौवनावस्थापूर्वी, गर्भावस्था, स्तन्यपानकाळ, रजोनिवृत्ति या अवस्थेतच मासिक स्राव नसतो. इतर काळात मासिक पाळी नियमित असणे, त्रास न होणे हे आवश्यक आहे. आयुर्वेदात (Ayurveda) शुद्ध आर्तव लक्षणे सांगितली आहेत. त्यानुसार, दाह वेदनारहित पाच दिवस मासिक पाळी येणे नैसर्गिक आहे. यापेक्षा जास्त दिवस व जास्त प्रमाणात रक्तस्राव होणे रक्तप्रदर समजला जातो.
रक्त प्रदराची लक्षणे काय ?
चक्कर, अशक्तपणा, सतत तहान लागणे, उष्णता जाणवणे, रक्ताल्पता, सतत झोपावेसे वाटणे ही लक्षणे जाणवतात. रक्ताच्या गाठी पडणे, ओटीपोटात दुखणे, दुर्गंध असणे अशी लक्षणे पण उपस्थित असतात. रक्त प्रदर होण्याची कारणे काय असू शकतात ? आयुर्वेदात असृग्दर म्हणजेच रक्तप्रदर निर्माण होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
- विरुद्धाहार हे सर्वात मोठे व महत्त्वाचे कारण रक्तप्रदराचे आहे. विरुद्धाहार म्हणजे काय हे आधीच्या लेखात आपण बघितलेच आहे. आहार रस प्रत्येक अवयवाचे पोषण करतो त्यामुळे आहाररस चांगला नसेल तर गर्भाशयाचे पोषण चांगले होत नाही व त्रास सुरु होतात.
- मद्यपान
- अजीर्ण असतांना जेवण करणे, अजीर्ण असणे.
- गर्भपात, अति मैथून
- सतत प्रवास, शरीराला सतत धक्के बसणे.
- भारी वस्तू उचलणे.
- आघात होणे मार लागणे.
- दिवसा झोपणे
- क्रोध, चिंता मानसिक अस्वास्थ्य ही कारणे रक्तप्रदराची सांगितली आहेत.
या कारणांनी अंतःस्रावी ग्रंथिंमधे असंतुलन, ग्रंथि अर्बुद निर्माण होणे, रक्तभारवृद्धी असे बदल घडत जातात व रक्तप्रदर दिसून येतो.
काळजी काय घ्यावी ?
- कारणांचा त्याग करणे.
- विश्रांती घेणे.
- झोपून पायाखाली उशी ठेवणे.
- आहारात तिखट आंबट मसालेदार पदार्थ न घेणे.
- वैद्यकिय तपासणी, तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
रक्तप्रदरसारख्या व्याधीत वेळेत उपाय योजना व काळजी आवश्यक ठरते. हा आजार पाण्डू, सूज किंवा गर्भाशय निर्हरणापर्यंत जाऊ शकतो. अनेक वेळा स्त्रिया स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतात जे गंभीर आजारात परावर्तीत होऊ शकते.
ह्या बातम्या पण वाचा :
- गर्भधारणा होण्यापूर्वी …
- मल मूत्रादि नैसर्गिक वेगाचे धारण अनेक रोगांना आमंत्रण !
- अतिकृशता – वेळीच लक्ष देणे गरजेचे !
- दिवसा झोपणे – योग्य कि अयोग्य ?
- नवजात बाळांची काळजी – भाग १ कुमारागार
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला