विनोद तावडेंना भाजपने उमेदवारी न दिल्याचे आश्चर्य – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad

मुंबई/नागपूर :- राज्यातील विद्यमान भाजप सरकारमधील आघाडीचे मंत्री विनोद तावडेंना यावेळी भाजपने चक्क उमेदवारी दिली नाही. याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनीही आश्चर्य व्यक्त करीत, अशी वेळ कुणावरही येऊ नये. आज मी त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना काय झाल्या असतील, हे समजू शकतो, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

आव्हाड म्हणाले, विद्यार्थिदशेपासून तावडेंनी भाजप आणि अभाविपचे काम केले. विनोद तावडेंनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना विधानसभा निवडणूक न लढण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तावडेंचेच तिकीट कापल्यानंतर त्यांची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली असून तावडेंची खिल्लीही उडविण्यात येत आहे.

ही बातमी पण वाचा : जितेंद्र आव्हाडांनी विरोधी उमेदवार अभिनेत्री दीपाली सय्यदसाठी गायलं हे खास गाणं

विधानसभेतील कामकाजावेळी विनोद तावडेंनी जितेंद्र आव्हाडांना उपरोधात्मक टोला लगावला होता. अध्यक्ष महोदय, त्यांना (आव्हाड) बोलू द्या ! पुढच्या वेळेस ते विधानसभेत येतील की नाही याची काही खात्री नाही, असा टोमणा मंत्री तावडे यांनी आव्हाड यांना विधानसभेत लगावला होता. आज भाजपने तावडेंचे तिकीट कापले आहे. त्यावर, जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले. आव्हाड यांना विधानसभेतील तो किस्सा आठवला. तर, विनोद तावडेंना तिकीट नाकारल्यामुळे आता तावडेच विधानसभेत दिसणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

तावडे, नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे, एकनाथ खडसे यांना भाजपने तिकीट न दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे. तर नागपुरात बावनकुळे समर्थक फारच संतापले आहेत. यामुळे नागपुरात भाजपला काही जागांवर फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.