हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी, ४९ जागांवर विजय

Hydrabad BJP

हैदराबाद: हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीच्या (Hyderabad Municipal Corporation election) निकालात यंदा भाजपने जोरदार इनकमिंग केले आहे. २०१६ साली झालेल्या निवडणुकीत अवघ्या चार जागा मिळवणाऱ्या भाजपने या निवडणुकीत ४९ जागांवर विजय मिळवून दक्षिणेत एंट्री केली आहे. ओवेसी बंधुंच्या एमआयएम (MIM) पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशामुळे हैदराबादमधील राजकीय समीकरणेच बदलून टाकली आहेत.

ग्रेटर हैदराबाद पालिका निवडणुकीच्या सर्वच्या सर्व १५० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत टीआरएसने ५६ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने ४९ आणि एमआयएमने ४३ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला केवळ दोनच जागांवर विजय मिळविता आला. जाहीर झालेल्या निकालामुळे सत्ता स्थापनेसाठी त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे.

हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेले घवघवीत यश हे एमआयएमसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीसाठी भाजपने अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री हैदराबाद निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपकडून ध्रुवीकरणाचे प्रयत्न झाले होते. आजचे निकाल पाहता भाजपची ही रणनीती चांगलीच यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एमआयएमला भाजपने तिसऱ्या क्रमांकावर फेकले आहे. त्यामुळे या निवडणुकीत ओवेसींचं संस्थान खालसा झाल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे.

गेल्या निवडणुकीत अवघ्या चार जागा जिंकणाऱ्या भाजपने थेट ४९ जागा जिंकल्या आहेत. म्हणजे भाजपने तब्बल ४५ जागा अधिकच्या जिंकून हैदराबादमधील राजकीय समीकरणंच मोडीत काढले आहेत. भाजपने टीआरएसच्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक विजय मिळवून टीआरएसच्या गडालाही भगदाड पाडले आहे.

ही बातमी पण वाचा : हैदराबाद : ओवेसींच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलले, भाजपा दुसऱ्या स्थानावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER