विजय वडेट्टीवारांच्या विरोधात सोमवारी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचा ‘शंखनाद’

नाशिक : साधूंबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात भाजपाची आध्यात्मिक आघाडी उद्या (सोमवारी) नाशिकच्या रामकुंडावर शंखनाद आंदोलन करणार आहे, अशी माहिती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी पत्रपरिषदेत दिली. भाजपाचे नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे उपस्थित होते.

वडेट्टीवार मनोरुग्ण आहेत, अशी टीका करून भोसले म्हणालेत की, उद्या १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०: ३० वाजता रामकुंड, पंचवटी नाशिक येथे साधू-संतांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलन करण्यात येईल.

काँग्रेस हिंदू विरोधी

विजय वडेट्टीवार हे मनोरुग्ण मंत्री आहेत. साधूंच्या वेशातल्या २-४ भोंदूंनी गैरवर्तन केले म्हणून सर्वस्व त्याग करुन साधना करत असलेल्या हिंदू समाजाच्या पवित्र साधू परंपरेला शिव्या घालणे मंत्र्यांना शोभत नाही. जैन साधू परंपरेचा देखील हा अपमान आहे. हिंदू विरोध हा काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे त्यामुळे त्यांच्या पोटातले आज ओठावर आले आहे, अशी टीका तुषार भोसले यांनी केली.

हे ‘तुमच्या’ हिंदुत्वाच्या व्याख्येत बसते?

१५ डिसेंबर २०२० रोजी विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले होते की, “हा महाराष्ट्र साधू-संतांचा आहे आणि आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही”. तुमचेच मंत्री आज साधूंना नालायक म्हणतात हे तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसते का? असा सवालही त्यांनी केला.

रावणाला लाजवेल असे मंत्रिमंडळ!

तुमचे मंत्री महिलांवर अत्याचार करतात. शरजील सारखे हिंदुंना शिव्या घालून जातात; आता तर तुमचे मंत्री साधूंना शिव्या देत आहेत. तुमचे असे हे मंत्रिमंडळ तर रावणाच्या मंत्रिमंडळाला लाजवेल, असे स्वैराचारी मंत्रिमंडळ आहे, अशी टीका भोसले यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER