भाजपचा आत्मा ‘ईव्हीएम’मध्ये, काँग्रेसचा भाजपला टोला

Nana Patole & Pravin darekar

मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेचा पर्याय असावा, यासाठी पुढाकार घेतला आहे. मतदारांना निवडणुकीत मतपत्रिकेचा पर्याय मिळावा यासाठी विधिमंडळाने कायदा तयार करावा, अशा स्पष्ट सूचना नाना पटोले (Nana Patole) यांनी दिल्या आहेत. या सर्व घडामोडींवरुन राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी निवडणूक कोणत्या पद्धतीने घ्यावे, तसाच हा प्रश्न निवळणूक आयोगाचा आहे, असे स्पष्ट केले.

याबाबत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचा आत्मा ‘ईव्हीएम’मध्ये आहे, असा आरोप केला. मोदी सरकारची लोकप्रियता दाखवण्याचे कारण ‘ईव्हीएम’ आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले संविधानिक पदावर आहेत. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि राज्य सरकारला सूचना केली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाची देखील भूमिका आहे. दुसरीकडे भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आणि हे सर्व राज्याने पाहिले. तसेच ठाकरे कुटुंबीयांवर सुशांतसिंग राजपूत प्रकरणीसुद्धा वैयक्तिक हल्ले केले गेले. त्यामुळे भाजपवर विश्वास ठेवण्यासारखे काही नाही, असे सचिन सावंत म्हणाले.

उलटा प्रवास करु नये : प्रविण दरेकर

विधानसभा अध्यक्षांनी काय करावे, हे नियम घालून देण्यात आले आहेत. हा विषय केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येतो. आपला देश सुधारणेच्या वाटेवर आहे. मतपत्रिकेवरुन ‘ईव्हीएम’ आणले आणि आता ईव्हीएमवरून ‘मतपत्रिका.’ उलटा प्रवास करण्याचा प्रयत्न दिसत आहे. नियम सर्वांना सारखेच, सरकारं येतात आणि जातात. त्यामुळे पूर्वग्रहाने भूमिका घेऊ नये. भाजपला देशभरात यश मिळत आहेत. विरोधी पक्ष त्यांचे अपयश लपवण्यासाठी अशा भूमिका घेत आहे. देश प्रगतीकडे जात असताना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे, अशी भूमिका प्रविण दरेकरांनी मांडली.

जनभावनेचा आदर करणे सरकारचे काम आहे : नवाब मलिक

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे एक याचिका आली होती. त्यावर आदेश देत, लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी कायदे करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अधिकार राज्यांना आहेत. जनभावनेचा आदर करणे सरकारचे काम आहे. प्रगत देशात ‘ईव्हीएम’चा वापर केला जात नाही. त्यामुळे मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER