‘एक गेला तर दुसरा येतो’, १३ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपची प्रतिक्रिया

NCP-BJP

जळगांव : भुसावळ नगरपालिकेतील (Bhusawal Municipality) भाजपच्या (BJP) नगराध्यक्षांसह 13 नगरसेवक, त्यांचे कुटुंबीय आणि अर्धशतकी संख्या असलेल्या मंडळीनी, 14 फेब्रुवारीला राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे भाजप बॅकफूटवर आली आहे. त्यातच आता भुसावळ नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांनी संपन्न होणार आहे. अशा परिस्थितीत पक्षाला बसलेला झटका हा निश्चितच आगामी निवडणुकीसाठी घातक ठरु शकतो. अशा परिस्थितीत भाजपने प्रतिक्रिया दिली.

भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे म्हणाले की, आमच्या काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. त्यांनी पक्षांतर करताना पळवाट शोधली आहे. त्यांनी पक्षाला प्रत्यक्ष सोडचिठ्ठी दिलेली नाही. मात्र, कुटुंबीय आणि समर्थकांचा त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला आहे. यामुळे पक्षाला निश्चितच फटका बसेल. पण तो फार काळ टिकणारा नसेल. कुणी पक्ष सोडून गेले म्हणजे पक्ष आपले काम थांबवत नसतो. एक जण गेला की दुसरा येतो. एकाचे काम थांबले की दुसऱ्याला संधी मिळत असते. आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही आतापासून मोर्चेबांधणी करू. पक्षातील नव्या लोकांना संधी, जबाबदारी देऊ.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करतांना माजी आमदार संतोष चौधरी यांनी सांगितले की, आता लोकांनीच भाजपला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्याची प्रचिती दिसून आली. भुसावळ नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. पण गेल्या साडेचार वर्षांत शहराचा विकास तर सोडा मात्र, शहर अनेक वर्षे मागे पडले. मूलभूत सुविधा येथील नागरिकांनाअद्यापही मिळाली मिळत नाही, हे दुर्दैव आहे. भाजपातील मुस्कटदाबी सहन करायची नाही म्हणून नगरसेवकांचा एक मोठा गट आमच्याकडे आला आहे. भुसावळ शहराचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही आता प्रयत्नशील राहू. शहराचा विकास राष्ट्रवादीशिवाय होणार नाही, हे जनतेला माहिती झाले आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपला पिछाडीवर ठेऊ असा विश्वास संतोष चौधरी यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER