नितीशकुमार यांचे महत्त्व कमी करण्याचा भाजपाचा डाव यशस्वी : पृथ्वीराज चव्हाण

- काँग्रेसच्या जागा वाढतील अशी अपेक्षा होती ...

Prithviraj Chavan

मुंबई : बिहारच्या निवडणुकीच्या कलावरून नितीशकुमार यांचे महत्त्व कमी करण्याचा भाजपाचा डाव यशस्वी होताना दिसतो आहे.मात्र, काँग्रेसला २७ च्या आसपास जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. तसे होताना दिसत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

ते म्हणालेत, लोजपाला वेगळ लढायला लावून नितीशकुमार यांच्या पक्षाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला. आमची अपेक्षा मागील जागांपेक्षा जास्त जागा मिळतील अशी आशा होती. काँग्रेस हा राष्ट्रीय विरोधी पक्ष आहे. भाजपला रोखण्याची जबाबदारी आमची आहे, मात्र त्यात यश येताना दिसत नाही.

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी प्रकृती चांगली नसल्याने त्या आक्रमकपणे प्रचार करु शकत नाहीत. राहुल गांधी यांनी कोणत्या ठिकाणी आणि किती सभा घ्यायच्या याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जातो. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी जास्त जागा मिळवण्याची शक्यता कमी आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीए सध्या १२८ जागांवर आघाडीवर आहे. भाजपाच्या नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महागठबंधन सध्या १०४ जागांवर आघाडीवर आहे.

मतमोजणीला रात्र होणार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या संथ वेगामुळे प्रत्यक्ष निकाल स्पष्ट होण्यास आणखी सहा ते सात तासांचा अवधी लागू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या जवळपास ३० हजारांनी वाढवण्यात आली होती. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत साधारण २० टक्केच मतांची मोजणी होऊ शकली होती. अद्याप ३ कोटी मतांची मोजणी बाकी आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER