भाजपचे गणित फिरले, सिंदखेड राजा नगर परिषदेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष होणार

NCP - Maharashtra Today

बुलढाणा : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची गणितं बदलली. मातृतिर्थ सिंदखेड राजा येथेही पक्षीय बलाबलाचे गणित असे काही फिरले की, ५ वर्षांसाठी उपनगराध्यक्ष झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नंदा मेहेत्रे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्याविरोधात १५ नगरसेवकांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केल्याने पद वाचविण्यासाठी संख्याबळ आपण काहीही केल्या जुळवू शकत नाही, हे लक्षात येताच आज त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

उपनगराध्यक्ष नंदा मेहेत्रे यांनी आज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्याकडे अविश्वास येण्याअगोदरच राजीनामा सुपूर्द केला आहे. महाविकास आघाडीच्या नगर परिषद मधील नगराध्यक्षांसह ३१ मे रोजी १५ सदस्यांनी अविश्वासाचे पत्र मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे उपनगराध्यक्ष नंदा मेहेत्रे यांच्यावर अविश्वास येणार, हे निश्चित होते. सिंदखेड राजा नगरपालिकेत एकूण १७ नगरसेवक आहेत. त्यांपैकी शिवसेनेचे नगराध्यक्ष लोकनियुक्त आहेत तर नगरसेवकांपैकी शिवसेना ७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ८, भारतीय जनता पार्टी १ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे त्याचा परिणाम सिंदखेड राजा नगरपालिकेवरसुद्धा पडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या उपनगराध्यक्ष नंदा मेहेत्रे यांच्यावर महाविकास आघाडीच्या १५ नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. भारतीय जनता पक्षाकडे नगर परिषदेमध्ये एकच जागा असल्यामुळे संख्याबळ नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मागील नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना भाजपची युती होती. नगराध्यक्ष पद हे शिवसेनेकडे होते. तर नगर उपाध्यक्ष पद हे ५ वर्षांसाठी भाजपकडे, असा फॉर्म्यूला ठरला होता.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येसुद्धा महाविकास आघाडीची ताकद वाढताना दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून मातृतिर्थ सिंदखेड राजा नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपनगराध्यक्ष होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button