भाजपचा एल्गार; पण सरकार डेंजर झोनबाहेर

CM Uddhav And Devendra Fadnavis Editorial

badgeदेवेंद्र फडणवीस हे जास्त काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत, असे भाकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी नुकतेच नागपुरात एका कार्यक्रमात केले. संघाच्या नेत्यांचा राजकीय भाकितं करण्याचा स्वभाव नाही. पण गेल्या १५ दिवसांत उद्धव सरकार लवकरच पडणार असल्याच्या बातम्या संघ परिवारातून पद्धतशीरपणे सोडल्या जात आहेत. सरकार ११ दिवसांत पडेल, असे भविष्य माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कालच केले. पण एक सांगू का? उद्धव सरकार पडणे आता सोपे नाही. हे सरकार केव्हाच डेंजर झोनबाहेर गेले आहे. पाच वर्षे पायऱ्यांवर आंदोलन करायचे एवढेच काम भाजपला उरले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिक सुधारणा कायद्याला पाठिंबा देऊन दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे छातीचे ठोके वाढवले हे खरे. पण शरद पवारांशी झालेल्या भेटीत ‘डॅमेज कंट्रोल’ झाले. आपले सरकार समान विकास कार्यक्रमावर चालेल, असा शब्द उद्धव यांनी सोनिया गांधी यांनाही दिला आहे. सरकारचा रिमोट आपल्या हाती आहे हे भासवण्याची धडपड उद्धव अधूनमधून करतात. पण मामला अंगाशी येतोय असे पाहताच घूमजाव करतात. त्यामुळे सरकारला धोका नाही. तिन्ही पक्षांची भूमिका वेगवेगळी असली तरी सरकारची भूमिका एक आहे. ती आहे सत्तेला चिकटून राहायची. वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवायला तिन्ही पक्ष तयार आहेत. अवघ्या तीन महिन्यांत १५ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी करून महाविकास आघाडीच्या ह्या सरकारने तीन चाकांची आपली रिक्षा टॉप गेअरमध्ये टाकली आहे.

सरकार तूर्तास पडणार नाही हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपलाही कळते. पण २०२४ च्या वातावरणनिर्मितीसाठी भाजपला उठापटक करणे भाग आहे. सध्या मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी विधानसभेत गोंधळ घालून भाजपने कामकाज बंद पाडले. उद्धव सरकारने दिलेली शेतकरी कर्जमाफी कशी फसवी आहे ते सांगण्यासाठी भाजपने एल्गार पुकारला. ह्या महिन्यात सत्तापक्ष आणि विरोधकांमध्ये संघर्ष पेटणार आहे. उद्धव कमी बोलतात. पण त्यांचे बारीक काम चालू असते. ह्या अधिवेशनात त्यांना मर्यादा आहेत. सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याने अर्थसंकल्पात सरकारला लोकप्रिय घोषणा करणे शक्य नाही. देवेंद्र सरकारची कर्जमाफी १८ हजार कोटी रुपयात गुंडाळली गेली.

ही कर्जमाफीही त्याच्या आसपास संपवली जाईल. पैसे आहेत कुठे? पण म्हणून अंगावर येणाऱ्या भाजपला रोखण्याचाही बंदोबस्त सरकारने केला आहे. देवेंद्र सरकारमधील चार वादग्रस्त मंत्र्यांच्या चौकशीचे दडपलेले अहवाल विधानसभेत मांडून भाजपला घेरण्याची रणनीती उद्धव यांनी आखली आहे. उद्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. सावरकर हा सध्या संवेदनशील विषय आहे. सावरकरांच्या अभिनंदनाचा विषय भाजप उद्या विधानसभेत आणू शकतो. तसे झाले तर शिवसेनेची कोंडी होईल. कारण दोन्ही काँग्रेसला ते अडचणीचे आहे. ‘तुझे माझे जमेना, पण तुझ्यावाचून करमेना’ असा हा मामला आहे.