सुशांत सिंह प्रकरणात भाजपाचे षडयंत्र उघड; एसआयटी चौकशीची काँग्रेसची मागणी

Sushant Singh Rajput - BJP - SIT - Sachin Sawant
  • महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचणाऱ्या सूत्रधारांचा शोध घ्या
  • भाजपाच्या सोशल मीडिया रॅकेटचा पर्दाफाश करण्याची गरज

मुंबई : सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) याने आत्महत्या केल्याचा अहवाल एम्समधील डॉ. सुधीर गुप्ता यांच्या पथकाने दिलेला असून मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) चारित्र्य उजळून निघाले आहे. त्यांनी केलेली चौकशी प्रामाणिक व योग्य दिशेनेच चालली होती. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलिसांचा तपास योग्यच होता, असे म्हटले होते. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करणारा भाजपा उघडा पडला आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या मास्टर माइंडचा शोध लावण्यासाठी आता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मोदी सरकारचे (Modi Government) अपयश लपवण्यासाठी व सुशांत सिंह प्रकरणाचा बिहार निवडणुकीत वापर करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे एक मोठे षडयंत्र रचण्यात आले होते. याचबरोबर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी, महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान भाजपाने (BJP) रचले होते. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे (Gupteshwar Pandey) यांनीही या बदनामीच्या कटात महत्त्वाची भूमिका वठवली होती. तर रातोरात शेकडो फेक सोशल मीडिया अकाउंट उघडून त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी करण्यात आली. या सर्वांचे पितळ उघडे पडले आहे.

गोदी मीडियानेही महाराष्ट्राला बदनाम करण्याचा अजेंडा चालवला. तपास यंत्राणांनीही खोटी माहिती लिक केली. कालपर्यंत सीबीआयचा हवाला देत ३०२ चा गुन्हा दाखल केला जाणार एवढ्या निखालस खोट्या, कपोलकल्पित बातम्या देण्यात आल्या. भाजपाचे नेते, त्यांचा आयटी सेल व गोदी मीडियाला हाताशी धरून पद्धतशीरपणे महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली. विरोधी पक्षाच्या सरकारांची बदनामी करण्याची भाजपाची कार्यपद्धती लोकशाहीसाठी घातक असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध घेणे आवश्यक आहे, असे सावंत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER