‘भाजपाचे वर्तन दुटप्पी !’ प्रल्हाद मोदींचा संताप

- नरेंद्र मोदींचे नातेवाईक असल्याचा फायदा घ्यायचा नाही

अहमदबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची पुतणी सोनल मोदी यांना भाजपाने अहमदाबाद महानगरपालिकेचे तिकीट नाकारले. यावर सोनल यांचे वडील, नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद (Pralhad Modi) यांनी भाजपाचे (BJP) वर्तन दुटप्पी आहे, असा संताप व्यक्त केला. नेत्यांचे नातेवाईक, महापालिकेत तीनदा कार्यकाळ पूर्ण करणारे आणि ६० वर्षांपेक्षा जात वय असणाऱ्यांना उमेदवारी न देण्याचे निकष भाजपाने लावले. त्यामुळे पंतप्रधानांच्या पुतणीला तिकीट नाकारण्यात आले.

यानंतर एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने प्रल्हाद मोदी यांची विशेष मुलाखत प्रसारित केली. त्यात प्रल्हाद मोदींनी सोनलला तिकीट नाकारण्याच्या भाजपाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणालेत, माझी मुलगी ओबीसींसाठी राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरून आमचा उदरनिर्वाह होत नाही. आम्ही सगळे मेहनत करतो, माझे किराणा दुकान आहे. नरेंद्र मोदींनी १९७० मध्ये घर सोडले आणि संपूर्ण देशाला स्वत:चे कुटुंब बनवले. त्यांचा जन्म आमच्या कुटुंबातला असला तरी ते भारतमातेचे पुत्र म्हणून वाटचाल करत आहेत.

मग, नातेवाईक हा निकष लावला तर कुणीच निवडणूक लढवू शकणार नाही; कारण सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे नरेंद्र मोदी स्वत: म्हणतात; त्यामुळे हा नियम फक्त आम्हाला कसा काय लागू होईल? आमच्या रेशन कार्डवर नरेंद्र मोदी यांचे नाव नाही. मग ते आमच्या कुटुंबाचा भाग आहेत, असे म्हणता येईल का? एकाच रेशन कार्डवर नावं असतात ते कुटुंब असते, केंद्र सरकारने रेशन कार्डसाठी नियम बनवले आहेत आणि ते पाळते जातात. पक्षानेही त्याचे पालन करायला हवे. सोनल मोदींनी कधी पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी भेट दिली का? हे तपासले तर आमचे नाते किती घट्ट आहे याची कल्पना तुम्हाला येईल.

अद्याप मी पंतप्रधानांच्या घराचे दार पाहिले नाही तर ते माझ्या मुलांना कसे माहिती असेल? ते आईला भेटतात, इतर कुटुंबीयांना दूर ठेवतात. गेल्या काही वर्षांतले फोटो पाहिले तर या भेटीत आईव्यतिरिक्त कुणीच नाही हे दिसेल, असे प्रल्हाद यांनी लक्षात आणून दिले. नरेंद्रभाई येतात आणि आईला भेटतात तेव्हा घरातली छोटी मुलंही तिथे नसतात, हा अन्याय वाटत नाही का? आईसोबत बसायची परवानगी फक्त नरेंद्रभाईंना आहे, घर सोडल्यामुळे त्यांना कुटुंबाची गरज नाही असे कदाचित वाटत असावे. आमचा भाऊ देशाचा पंतप्रधान झाला आहे ही अभिमानाची गोष्ट आहे; परंतु त्यांच्या नावाचा वापर आम्ही कधीही काहीही मिळवण्यासाठी केला नाही आणि भविष्यातही करणार नाही, अशी ग्वाही प्रल्हाद यांनी दिली.

जय शहा बीसीसीआयचा सचिव कसा झाला ?
पक्ष जो काही निर्णय घेतो तो नेते आणि कार्यकर्ते यांना सारखा लागू होतॊ. राजनाथ सिंह यांचे चिरंजीव संसदेचे सदस्य बनू शकतात, मध्यप्रदेशातील विजयवर्गीयांचे चिरंजीव आमदार होऊ शकतात. अमित शहांचे चिरंजीव जय शहा यांचं क्रिकेटमध्ये काहीही योगदान नसताना त्यांच्याकडे बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी येते. याचा अर्थ पक्षाचे वर्तन दुटप्पीपणाचे आहे. माझी मुलगी नरेंद्र मोदींची पुतणी आहे, केवळ हीच तिची पात्रता नाही; आश्वासक नेता होण्याची तिची पात्रता आहे, विजयाची शक्यता असेल तर पक्षाने तिला तिकीट द्यायला हवे. नरेंद्र मोदींचे नातेवाईक असल्याचा आम्हाला फायदा घ्यायचा नाही, असे प्रल्हाद मोदींनी निक्षून सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER