लोकांना त्रास होईल असा कुठलाही निर्णय भाजप खपवून घेणार नाही – प्रवीण दरेकर

Pravin Darekar

मुंबई :- राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनचे (Lockdown) संकेत देण्यात येत आहे. अशा वेळी ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ अशा  घोषणा दिल्या जातात, कोरोनाच्या बाबतीत ही घोषणा लागू आहे का ? राज्यातील अर्थव्यवस्था कोलमडली असताना पुनः टाळेबंदी करून सर्वसामान्य लोकांचे हाल होण्याची सरकार वाट पाहात आहे का? असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी राज्य सरकारला विचारला. दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्य सरकावर जोरदार निशाणा साधला.

लॉकडाऊनच्या संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचं दरेकरांनी सांगितलं. सरकारला लॉकडाऊन लावायचाच असेल तर अगोदर सर्व क्षेत्रांतील कष्टकऱ्यांच्या खात्यात, परीक्षा देणारे तरुण, छोटा व्यावसायिक, कष्टकरी, संघटित व असंघटित कामगारांच्या खात्यात पाच  हजार रुपये जमा करा आणि मगच लॉकडाऊनचा निर्णय घ्या, अशी मागणी दरेकरांनी केली. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता वाऱ्यावर सोडल्याचं दिसून येत आहे. देशाच्या तुलनेत राज्याचा ढिसाळ कारभार सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोपही दरेकरांनी केला. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा खेळ सुरू आहे. वर्षभरात आलेले अपयश लपवण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

परंतु, सर्वसामान्यांना त्रास होईल अशी कोणतीही भूमिका भाजप खपवून घेणार नाही, असा इशाराच दरेकरांनी दिला. नाशिकमध्ये रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा आज मृत्यू झाला. त्यापूर्वी नाशिकच्या दौऱ्यात आयुक्तांची भेट घेऊन बेड्स, व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत, हे लक्षात आणून दिलं होतं. दौऱ्यावरून परत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही कल्पना दिली होती. पण हे सरकार आणि प्रशासन झोपेतून जागं होत नाही. त्यामुळे या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध आणि खुद्द सरकारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणीही दरेकर यांनी केली. केंद्र सरकारने कोरोना काळात अनेक उपाययोजना केल्या, सर्वसामान्यांना मदत केली. त्यामुळेच देशपातळीवर केंद्र सरकार कोरोना रोखण्यात यशस्वी ठरले.

केंद्र सरकारने राज्याला सर्वतोपरी मदत केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरलं आहे. केंद्राने राज्याला दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी ४०० व्हेंटिलेटर प्रशिक्षित तंत्रज्ञ नाहीत म्हणून धूळ खात पडून आहेत. राज्यातील सरकार जनतेच्या जीविताचं  रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला, गृह विभागाला आमची विनंती आहे की, त्यांनी राज्यात लक्ष घालावे आणि कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही दरेकरांनी यावेळी केली.

ही बातमी पण वाचा : आमची विचारधारा वेगळी, भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही; राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button