कितीही प्रयत्न करा, सरकार पाडण्यात भाजपला कधीच यश मिळणार नाही: शरद पवार

मुंबई: महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजपाने (BJP) कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना यामध्ये कधीच यश मिळणार नाही. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे असं वक्तव्य आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं पवार यांनी सांगितलं. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटिसा म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीकाही पवारांनी केली. ते पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. आधी त्यांना दोन महिन्यात ठाकरे सरकार पाडायचं होतं. नंतर सहा महिन्यात सरकार पाडणार होते. नंतर पुन्हा आठ महिन्यात सरकार पाडणार होते. पण कुठलंच यश मिळालं नाही. उलट ठाकरे सरकारने आपला एक वर्षांचा कार्यकाळ व्यवस्थितपणे पूर्ण केला. ठाकरे सरकार स्थिर असून आपला कार्यकालही पूर्ण करेल, असं पवार म्हणाले.

दरम्यान, पवारांनी यावेळी ईडीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. ईडीमार्फत कारवाई म्हणजे हा सत्तेचा दुरुपयोग आहे. ईडीने मलाही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी ही नोटीस परत घेतली. मी बँकेच्या बोर्डाचा सदस्यच नव्हतो आणि त्या बँकेत माझं खातंही नव्हतं, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने मागच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण केलं आहे. शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसची विचारधारा भिन्न असल्याने हे सरकार पडेल असं भाजपला वाटत होतं. पण तसे झालं नाही. भाजप आणि शिवसेनेने 2019मध्ये विधानसभेची निवडणूक एकत्र लढवली होती. परंतु मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून वाद झाल्याने शिवसेनेने दोन्ही काँग्रेसशी घरोबा करत राज्यात सत्ता स्थापन केली. राज्यात महाविकास आघाडीचं समीकरण निर्माण करण्यासाठी शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. आता शरद पवार यांनी भाजपावर टीका करत महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षांसाठी स्थिर आहे. सरकार पाडण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना कधीही यश येणार नाही असं म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : ‘हा तर काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्याचा डाव’, काँग्रेस नेत्याचं सोनिया गांधींना पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER