भाजप नागपूरचा बालेकिल्ला राखणार! – भाजपचे संदीप जोशी अन् काँग्रेसचे वंजारी यांच्यातच मुख्य लढत

Sandeep Joshi-Abhijit Wanjari

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होत असून भाजपचे उमेदवार आणि नागपूरचे विद्यमान महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) विरुद्ध काँग्रेसचे अभिजित वंजारी (Abhijit Wanjari) यांच्यात मुख्य लढत होत आहे. भाजप आपला परंपरागत गड राखणार अशी चिन्हं आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे वडील गंगाधरराव फडणवीस, सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), नागपूरचे माजी महापौर अनिल सोले यांनी आतापर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मोठ्या फरकाने भाजपने हा गड जिंकत आणला आहे. गेल्यावेळचे उमेदवार अनिल सोले यांनी तिरंगी लढतीत दिमाखदार विजय मिळविला होता. यावेळी लढत सरळ असली तरी अ‍ॅडव्हान्टेज भाजपच आहे.

ही निवडणूक लोकसभा, विधानसभेसारखी नाही. मतदार नोंदणी, मतदारांपर्यंत व्यक्तिश: पक्षाच्या यंत्रणेने पोहोचणे याचे सूक्ष्म नियोजन पूर्वीपासूनच करावी लागते. भाजपकडे वर्षानुवर्षे त्यासाठीची यंत्रणा आहे. काँग्रेसने या मतदारसंघाकडे गांभीर्याने कधीही लक्ष दिले नाही. यावेळीही काँग्रेसने जी थोडीफार यंत्रणा उभी केली ती त्या पक्षाचे उमेदवार अभिजित वंजारी यांची वैयक्तिक आहे. वंजारी यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील विधानसभेचे सदस्य होते. संदीप यांचे वडील विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. संदीप हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. २ लाख १४ हजार मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्न करीत आहेत.

रिपब्लिकन (खो) पक्षाचे राजेंद्र चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे राहुल वानखेडे, मानवाधिकार पार्टीच्या सुनीता पाटील, अपक्ष अजय तायवाडे, अतुलकुमार खोब्रागडे, अमित मेश्राम, नितेश कराळे, प्रकाश रामटेके, प्रशांत डेकाटे, मो.शाकिर, सीए राजेंद्र भुतडा, विनोद राऊत, वीरेंद्रकुमार जयस्वाल, शरद जीवतोडे, संगीता बढे, संजय नासरे आणि विदर्भवादी पक्षसंघटनांतर्फे अपक्ष नितीन रोंघे हेही भाग्य अजमावित आहेत.रोंघे हे प्रचारासाठी सोशल मीडियाचा खुबीने वापर करीत आहेत. एक लक्षवेधी उमेदवार म्हणजे वर्धेचे शिक्षक नितेश कराळे. विद्यार्थ्यांना अवघड विषय सोप्या पण वºहाडी भाषेत शिकविणारे शिक्षक म्हणून ते सोशल मीडियात तुफान लोकप्रिय आहेत.

वंजारी हे दीड वर्षांपासून निवडणुकीची तयारी करीत होते. त्यातच त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाही पाठिंबा मिळाल्याने ते आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मतांचे विभाजन न होता लढत सरळ होणे ही भाजपचे संदीप जोशी यांच्यासाठी थोडी डोकेदुखी आहे. गेल्यावेळेपेक्षा त्यामुळे भाजपला जास्त ताकद पणाला लावावी लागत आहे.

नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांतील पदवीधर मतदार या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वंजारी यांच्या बाजूने जातीचे कार्ड खेळले जात असल्याचे जाणवत आहे. ते तेली समाजाचे आहेत. भाजपचे नेते, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही याच समाजाचे असून ते संदीप जोशी यांच्या निवडणुकीचे पक्षप्रभारी आहेत.

गेल्या निवडणुकीत भाजपचे अनिल सोले हे ३१ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांना ५२ हजार ४८५ मते मिळाली होती.तायवाडे यांना २८ हजार ८३६ मते मिळाली होती. काँग्रेसचे बबनराव तायवाडे दुसऱ्या तर माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये हे तिसऱ्या क्रमांकावर होते. गेल्यावेळपेक्षा अधिक मताधिक्याने यावेळी जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. तर राज्यात बदललेली सत्ता, महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणे, जातीय समीकरणे या आधारे भाजपचा गड हलविण्याचा प्रयत्न अभिजित वंजारी करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीचे बडे नेते त्यांच्या पाठीशी मनापासून उभे राहतात का यावर बरेच काही अवलंबून असेल. शिवसेनेचे या मतदारसंघात फारसे अस्तित्व नाही. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात मतदारसंख्या आहे आणि ते बहुसंख्येने भाजपला मतदान करतात हा दरवेळचा अनुभव आहे. संदीप जोशी यांची आक्रमक प्रचारयंत्रणा कामाला लागली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे नेटवर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आशीर्वाद त्यांच्यासाठी महत्त्वाचा असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER