मुलाखतीचा दंडक माफ, निवडून येणाऱ्यांना भाजपची उमेदवारी मिळेल

BJP

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका आता काही आठवड्यांवर आहे. अनंतचतुर्दशीनंतर निवडणूक तारीखदेखील जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने आता उमेदवारांच्या चाचपणीला आणि मुलाखतीला सुरुवात केली आहे. भाजपनेही जिल्हानिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. जिल्हास्तरावर भाजपच्या इच्छुक  उमेदवारांच्या मुलाखतीही सुरू आहेत. विधानसभेची उमेदवारी देण्यावरून भाजप नेते आणि वस्त्रोद्योग व पणनमंत्री राम शिंदे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

ज्या उमेदवाराला आपण निवडून येण्याची खात्री असेल अशा व्यक्तीने मुलाखत दिली नसली तरी त्या व्यक्तीसाठी मुलाखतीचा दंडक माफ करण्यात येईल आणि त्याला भाजपची उमेदवारी दिली जाईल, असे राम शिंदे यांनी सांगितले. ते सोलापुरात आले असताना बोलत होते.

राम शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील एकूण ११ मतदारसंघांत ९५ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. मुलाखत दिली म्हणजे उमेदवारी मिळेल, असे होत नाही. मुलाखत न घेतासुद्धा जे लोक बाजूला राहिलेत अशा इलेक्टिव्ह मेरिट असणा-यांना उमेदवारी मिळू शकते.