राज्यभरात भाजपातर्फे व्यापक सेवाकार्य अभियान

Chandrakant Patil

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी मुकाबला करण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर गरजूंना जेवण, कम्युनिटी किचन, गरजूंना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा आणि रक्तदान या माध्यमातून सेवाकार्य सुरू आहे. या सेवाकार्यात राज्यभरातील १ लाख २५ हजार कार्यकर्ते सहभागी झाले आहेत, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पाटील यांनी सांगितले की, राज्यभरातील सुमारे ६०० मंडलांमध्ये सेवाकार्य सुरू झाले असून ३०० ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू झाली आहेत. त्याचा लाभ हजारो गरजू घेत आहेत. लातूर, सातारा, जळगाव आदी १० जिल्ह्यांमध्ये रक्तदानाचे काम सुरू झाले आहे. सुमारे एक हजार खेड्यांमध्ये कोरोना विषाणू प्रतिबंधक फवारणीचे काम करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी अन्न आणि औषध पुरवठा करण्यासोबतच शेतकऱ्यांना बियाणे आणि खतेसुद्धा घरोघरी देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

याखेरीज नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईनही सुरू करण्यात आल्याची माहितीही पाटील यांनी दिली.

सद्य:स्थितीत कोणीही उपाशी राहू नये यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था पक्षातर्फे करण्यात येत आहे. पदाधिकारी, आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, मंडल आणि बूथ कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष यांच्याशी एकूण पाच संवादसेतूंच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात सुरू झालेल्या विविध सेवाकार्याचा नुकताच आढावा घेतला. राज्यभरातील शक्तिकेंद्र प्रमुखांना आणि १३ हजार राज्य परिषद पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य प्रभारी खा. सरोज पांडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक, सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा आदींनी संवादसेतूच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.