शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी-काँग्रेसची भाजपला साथ, चंद्रकांतसदादांच्या गावात शिवसेनेला धक्का

Chandrakant Patil - Balasaheb Thorat - Sharad Pawar

कोल्हापूर : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीने  (Congress-NCP) भाजपला साथ देत शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केली. शिवसेनेला पराभूत करण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा रंगली आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या खानापूर गावात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र शिवसेनेचा मेरु रोखण्यासाठी भाजपने चक्क ‘हाता’वर ‘घड्याळ’ बांधले. भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे स्थानिक नेते एकत्र आले.

राज्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली आहे. स्थानिक पातळीवर का असेना, पण शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी शड्डू ठोकत चक्क भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आबिटकर गटाला रोखण्याचं आव्हान
सतत होणाऱ्या आरोपांमुळे चंद्रकांत पाटलांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. खानापूर गावात आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतली आहे.

प्रकाश आबिटकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. सत्ता खेचून आणण्यासाठी आबिटकरांनी कंबर कसली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी रंगतदार निवडणूक पाहायला मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावागावात राजकीय धुरळा उडाला आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यभरातील जनतेचं लक्ष आपापल्या गावातील निवडणुकांकडे लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER