मनसेच्या सरकारविरोधी आक्रमक भूमिकेला भाजपचे समर्थन, बावनकुळेंचे मोठे विधान

Chandrashekhar Bawankule - Raj Thackeray

नागपूर : वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं मनापासून अभिनंदन. भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, अशी मोठी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. भाजपने महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच बावनकुळे यांनी हे विधान केल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे मोठं विधान केलं. वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन. भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, असं विधान बावनकुळे यांनी केलं. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

यावेळी बावनकुळे यांनी वाढीव वीज बिलावरून महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) गंभीर आरोप केले. वीज बिलाच्या मुद्द्यावर हे सरकार खोटं बोलत आहे. सरकारने १०० युनिट वीज माफीचं आश्वासन दिलं होतं. दिलेलं आश्वासन या सरकारने पाळलं नाही. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात सर्व व्यवसाय ठप्प होते. तरीही सरासरी बिल दिलं. ऊर्जामंत्री नितीन राऊतही (Nitin Raut) हतबल आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या फायली फेकून देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनात आणले तर ऊर्जा खात्याचे सर्व प्रश्‍न एका मिनिटात, चुटकीसरशी सुटू शकतात. पण त्यांना तसे करायचे नाहीये. त्यांना कॉंग्रेसच्या मंत्र्यांना बदनाम करायचे आहे. म्हणूनच हा खेळ त्यांनी चालविला आहे. पण या खेळात राज्यातील जनतेचे हाल होत आहेत, हे त्यांना विसरू नये. डॉ. नितीन राऊत चळवळीतून वर आलेले नेतृत्व आहे. त्यांना माझा सल्ला आहे की, त्यांना आता अशा सरकारमध्ये राहू नये आणि बदनाम होऊ नये.

सरकारच्या बोलण्यावर आता जनतेचा विश्‍वास राहिलेला नाही. जनतेचाच काय? सरकारमधील मंत्र्यांचाही एकमेकांवर विश्‍वास नाही. त्यामुळे सरकार नीट चालत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांचे, पूरग्रस्तांचे सर्वांचेच हाल होत आहेत. वीजबिल माफीसाठी ५ हजार कोटी रुपये लागतील. पण सरकार पैसे देण्यास तयार नाही. अनिल परब यांच्या परिवहन खात्याला कामगारांच्या पगारासाठी एक हजार कोटींची गरज होती. त्यांना एका मिनिटात पैसे देण्यात आले. मग वीजबिल माफीचा निर्णय का घेतला जात नाही. याच सरकारने सुरुवातीला १०० युनिट वीज बिल माफ करण्याचा शब्द दिला होता, तो पाळला नाही. दिलेले एकही वचन या सरकारने पाळले नाही. उलट आता ९५ लाख लोकांची वीज कापायला निघाले आहेत. ९५ लाख लोकांची वीज कापल्यावर त्याचा परिणाम थेट पाच कोटी जनतेवर होणार आहे. येवढे मोठे पाप हे सरकार कोठे फेडणार आहे? असा प्रश्‍न करून आपल्याच सरकारमध्ये ऊर्जामंत्री हतबल झाल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केले.

आम्ही पाच वर्षात शेतकऱ्याचं एकही कनेक्शन कापलं नाही. उलट आम्ही विदर्भात सात लाख वीज कनेक्शन दिलं, असं सांगतानाच या सरकारने विदर्भाचा सत्यानाश करण्याचं काम सुरू केलं आहे. विदर्भावरील अन्याय सहन करू नका, असं आवाहन त्यांनी केलं. राज्यातील पदवीधर या सरकारला सोडणार नाहीत. पदवीधरांच्या निवडणुकीत सरकारला पराभवाचा सामना करावा लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या सरकारच्या काळात अनेक अवैध धंदे वाढले आहेत. रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी वाढली आहे. नागपूर, भंडारा आणि यवतमाळवरून रेट ठरवून दारूची तस्करी वाढली आहे. सरकारच्या काळातील या धंद्यावर प्रकाश टाकला तर बिघडले कुठे?, असं सांगतानाच सरकार तुमचंच आहे. माझी खुशाल चौकशी करा, असं आव्हानच बावनकुळे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं नाव न घेता दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER