महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजपातर्फे राज्यभर निवेदने सादर

Chandrakant Patil

कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविकास आघाडीने निष्क्रियता सोडून प्रभावी उपाययोजना करावी तसेच शेतकरी, रोजंदारी कामगार आणि बारा बलुतेदारांसाठी पॅकेज जाहीर करावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी राज्यात सर्व जिल्ह्यांत सरकारला निवेदन सादर केले. राज्य सरकारला जाग आली नाही आणि सरकारने धडाडीने निर्णय घेतले नाहीत तर भाजपा ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ तीव्र करेल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने मुंबईत मा. राज्यपालांना निवेदन सादर केले व राज्य सरकारने परिणामकारक कामगिरी करून कोरोना रोखण्याचा आग्रह केला. या शिष्टमंडळात माजी मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार तसेच खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. अतुल भातखळकर यांचा समावेश होता. पनवेल येथे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आंदोलन समन्वयक रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, पुण्यात खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली, नागपूर येथे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली, चंद्रपूर येथे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व हंसराज अहीर यांच्या नेतृत्वाखाली, औरंगाबाद येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली, सोलापूरला माजी मंत्री सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, जळगाव येथे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली तर ठाण्यात खा. कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपातर्फे सरकारला निवेदन सादर करण्यात आले. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये व बहुतेक तालुक्यांमध्ये पक्षाच्या खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांनी सरकारला निवेदन सादर केले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असून राज्यातील विशेषतः मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोनाचे संकट हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने निष्क्रियता सोडून धडाडीने व ठाम निर्णय घ्यावेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी. कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे सामान्यांचे गंभीर आर्थिक नुकसान झाले आहे. कर्नाटकसह इतर अनेक राज्यांनी ज्या प्रमाणे स्वतःच्या तिजोरीतून सामान्यांसाठी पॅकेज जाहीर केले तसे पॅकेज जाहीर करावी, अशी भाजपाची मागणी आहे.

त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून शुक्रवार, दि. २२ रोजी राज्यभर पक्षाचे लाखो कार्यकर्ते आपल्या घराबाहेर फलक घेऊन निदर्शने करतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला