भाजप प्रदेशाध्यक्षांचा उद्या औरंगाबाद दौरा

पदाधिकारी, कार्यर्त्यांच्या मेळाव्याचेही आयोजन

औरंगाबाद :- महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शनिवारी (दि. २९) औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. शहरात दिवसभर चंद्रकांत पाटील यांचे वास्तव्य असणार आहे. उद्या दिवसभरात विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकांनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष मेळाव्यातून शहरातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

महानगरपालिका निवडणुकीच्या राजकारणाची शहरात सगळ्याच पक्षांमध्ये चांगलीच राजकीय घोडदौड पहायला मिळते आहे. त्यातच काही जणांची पक्षांची बदलाबदली पण सुरू आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश करून घरवापसी केली. २०१४ मध्ये मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छूक असतांना प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या तनवाणी यंनी राज्यातील युती तुटल्याचा फायदा उचलत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तनवाणींचा भाजपमधला हा प्रवेश भाजपला कितपत रूजला होता ते आत्तापर्यंतचे चित्र सांगत आहे. भाजपने वरवर स्वीकारलेला हा तनवाणींचा प्रवेश चांगलाच फायद्याचा करून घेतला. भाजपने शिवसेनेला टक्कर देण्यास तनवाणींना मैदानात उतरवले खरे पण दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा… त्याप्रमाणे या दोघांच्या भांडणात एमआयएमचा विजय झाला. नंतरच्या काळात पक्षातील वातावरणाचा रोख पाहता नाराज झालेल्या तनवाणींनी भाजपला खो दिला आणि आपल्या पूर्वीच्या पक्षात म्हणजेच शिवसेनेत प्रवेश केला. मात्र स्वबळावर मनपा निवडणूक लढणाऱ्या भाजपची रणनिती उद्या ठरण्याची शक्यता दिसून येत आहे.

चंद्रकांत पाटील यांचा दौरा भाजपला उभारी देईल?

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. शहरात मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. मागच्या बैठकीत अनेक इच्छुकांनी तयारी दाखवली होती. परंतु आताचे शहरातील भाजपचे चित्र बदललेले दिसते आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर किशनचंद तनवाणींसमवेत अनेकांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शहराध्यक्षांची उद्याची उपस्थिती भाजपसाठी महत्वाची असणार आहे.