मनसेसोबत युती? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले…

Chandrakant-Patil-Raj Thakre

पुणे : मनसेकडून युती करण्याबा बत अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मनसेसोबत युती करताना अमराठी भाषिकांबद्दलची मनसेची भूमिका भाजपाला विचारात घ्यावी लागेल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलले असून, येत्या काळात मनसे आणि भाजपा एकत्र येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर, चंद्रकांत पाटील यांचे हे वक्तव्य आले आहे.

गायक व संगीतकार अवधूत गुप्तेच्या प्रश्नांना आदित्य ठाकरे काय उत्तरे देणार?

आज गुरुवारी पुण्यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रपरिषद झाली. यावेळी त्यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत भाजपाची ही भूमिका मांडली. माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, अमराठी भाषिकांबद्दलच्या मनसेच्या भूमिकेत त्यांना बदल करावा लागेल. उद्योग आणि व्यवसायात ८० टक्के स्थानिकांना नोकरी मिळाल्यानंतर २० टक्के अमराठी भाषिक येतील. अमराठी भाषिक हे पाकिस्तान, बांगलादेशमधून आले आहेत का? असा सवालही यावेळी पाटील यांनी केला.

अमराठी भाषिकांसदर्भातील मनसेच्या भूमिकेत बदल झाला तर, आमचे नेतृत्व बसून निर्णय घेईल, मात्र, मनसे प्रमुख राज ठाकरेंकडून अद्याप तसा प्रस्ताव आलेला नाही, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.