भाजपाचे प्रवक्ते म्हणाले, ‘वारिस पठाण, गुजरात आठवतंय का?’

नागपूर :- एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथं हिंदू-मुस्लिमांबाबत विवादित विधान केल्यानं आता हा वाद आणखीनच चिघळला आहे. आम्ही १५ कोटी आहोत; पण १०० कोटींवर भारी पडू, असं विधान वारिस पठाण यांनी केलं होतं. त्यावर भाजपानेही तशाच पद्धतीनं उत्तर दिलं आहे. भाजपा प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी वारिस पठाण यांना चक्क गुजरातचं स्मरण करून दिलं आहे. “वारिस पठाणला गुजरात आठवत असेल, तिथला मुसलमान हिंमत करत नाही.” असं म्हणत गिरीश व्यास यांनी इशारा दिला.

आता गिरीश व्यास यांच्या या विधानानं नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. टीव्ही-९ मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा इशारा दिला. गिरीश व्यास म्हणाले, “वारिस पठाणने एकदा नागपुरात येऊन आपली हिंमत दाखवावी, आम्ही त्यांची योग्य तऱ्हेने व्यवस्था करू, आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारिस पठाणवर मुंबईबंदीची कारवाई करून अटक करावी. वारिस पठाणला देशद्रोही म्हणून पाकिस्तानला पाठवावं. वारिस पठाणला गुजरात आठवत असेल, तिथला मुसलमान हिंमत करत नाही. वारिस पठाणसारखी जहरी टीका करणाऱ्यांची जीभ कापण्याची ताकद भाजपाच्या कार्यकर्त्यांत आहे. ” असेही व्यास म्हणाले.

ठाकरे आणि सोनिया भेटीत शिवसेनेला संपुआत घेण्यावर चर्चा?

गिरीश व्यास नेमकं काय म्हणाले?
ज्या पद्धतीची भाषा वारिस पठाणने वापरली, त्यांना त्यांच पद्धतीने उत्तर देण्यासाठी देशातील युवक, देशभक्त आणि भाजपचा एक एक कार्यकर्ता तयार आहे. आम्ही संयमी, सहिष्णू आहोत याचा अर्थ असा नाही की याचा आम्ही बीमोड करू शकत नाही. गुजरात त्यांना आठवत असेल, ज्या कालुपूरमध्ये ज्या घटना घडल्या, त्या जर त्यांनी लक्षात घेतल्या, तर मला असं वाटतं की आज तिथला मुसलमान हिंमत करत नाही वर उठण्याची. मला आज मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे, ते शिवसेनाप्रमुख आहेत, त्यांनी अशा देशद्रोह्याला मुंबईबंदी घालायला हवी.

तसंच भारत सरकारनं त्याच्यावर बंदी घालून पाकिस्तानमध्ये सोडायला हवं. वारिस पठाणसारखेच ओवेसी आणि अकबरुद्दीन ओवेसी यांनीदेखील अशीच जहरी टीका केली होती. आम्ही सहन केली. पण भगतसिंहदेखील इथेच आहेत, चंद्रशेखर इथेच आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे. या राज्यात अशा लोकांची जीभ छाटण्याची ताकद भाजपच्या आणि हिंदुप्रेमी व्यक्तीच्या मनात आहे. वारिस पठाण यांना माझं आव्हान आहे, तुमची जर ताकद असेल, तर एकदा नागपूरला येऊनच बघा, आम्ही तुमची योग्य व्यवस्था करू. तुम्हाला काय वाटलं, आम्ही काय बांगड्या घातल्यात? आमचे दंड तयार आहेत तुमच्याशी निपटून घ्यायला. पण समाजामध्ये तेढ नको, सुसंवाद राहावा, या भूमिकेत आम्ही आहोत. माझी मुस्लिमांना विनंती आहे, की त्यांनी अशा लोकांचा बहिष्कार केला पाहिजे, जे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यांना योग्य पद्धतीने मुस्लिम समाजाने धडा शिकवावा, असं आवाहन गिरीश व्यास यांनी मुलाखतीवेळी केलं.