ठाकरे साहेब, शेतकऱ्यांचे अश्रू तरी बघा !

Ram Kulkarni & Uddhav Thackeray

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी (Ram kulkarni) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्रक लिहिले आहे. मुख्यमंत्री मुंबई बाहेर पडणार का ? मराठवाड्यात पाय ठेवणार का ? शेतकऱ्यांच्या संसारावर नांगर फिरला, किमान त्यांचे अश्रू तरी बघा, असे म्हणत शेलक्या शब्दांत  टीका केली आहे.

राम कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र :

संपूर्ण मराठवाडा अतिवृष्टीने ग्रासला असून शेतकऱ्यांच्या संसारावर नांगर फिरला आहे . खरिपाचे पिके तर १०० टक्के गेली. त्याचबरोबर चांगल्या जमिनी पावसामुळे खरडून  गेल्या आहेत. असं संकट पूर्वी कधीच आलं नव्हतं, कंबरा एवढ्या पाण्यात पंधरा दिवसांपासून खरिपाची  पिके आहेत. तोंडात आलेला घास गेला, अशी परिस्थिती सर्व जिल्ह्यात असून, उस्मानाबाद जिल्ह्यात तर पावसाने हाहाकार माजवला आहे. खरं  तर संकटात सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी मायबाप म्हणून सरकार असतं. मात्र विद्यमान महाआघाडी सरकारला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाविषयी कुठल्याही प्रकारच्या संवेदना नसून हे सरकार सापशिडीच्या खेळात गुंतले आहे.  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मुंबई सोडायला तयार नाहीत, खरं तर त्यांनी मराठवाड्यात पाय ठेवून बघावं, आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील  अश्रू प्रत्यक्ष पाहावे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे; पण काही केल्या मातोश्रीच्या बाहेर न पडणारे मुख्यमंत्री आणि त्यांचे पालकमंत्रीसुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर दिसत नाहीत. हे राजकीय दुर्दैव असून कुठे जाणार मराठवाडा? असा सवाल आता जनता करत आहे. खरं तर शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ आर्थिक मदतीची गरज आहे.

मानवी जीवावर वेगवेगळी संकटं येत असतात .मात्र त्याचा खंबीरपणे सामना लोकशाहीच्या जगात सरकार करीत असतं. वर्तमानकाळात गेल्या आठ महिन्यांपासून जगाच्या पाठीवर कोरोना संकटाने धुमाकूळ घातलेला आहे. आणि देशात सर्वाधिक कोरोनाचा  विळखा महाराष्ट्रात आहे .खरं तर संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार आणि आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत असताना, दुसरीकडे महाराष्ट्रात यंदा निसर्गाचा प्रकोप झाला आहे. कोकणात वादळ आलं आणि पाठोपाठ मराठवाड्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला. दोन दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाला .त्याच्यापासून झालेलं नुकसान आणि उडालेला हाहाकार डोळ्यांनी पाहात नाही. मराठवाड्यातल्या औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, नांदेड, हिंगोली, लातूर या सर्व जिल्ह्यांमध्ये  पावसाने शेतकऱ्यांची खरीप पिके कंबरा एवढ्या पावसात आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून शेतीचे तळे झालेली अवस्था मराठवाड्यात आहे.

नुकसानीचे पंचनामे ना कोणी करत, ना कोणी सत्ताधारी भेटायला येत. मराठवाडा आणि शेतकरी फार मोठ्या संकटात आहेत. शेतकऱ्यांच्या संसारावर नांगर फिरल्याची गत झाली आहे. शेतीमालाचे झालेले नुकसान, सुपीक शेतीचे झालेले नुकसान डोळ्याने पाहवत नाही. आज शेतकरी ढसाढसा रडत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहण्यासाठी कोणीही सत्ताधारी भेटायला येत नाही. कोणी शेतीच्या बांधावर येत नाही. मराठवाड्यात एकाही पालकमंत्र्याने शेतकऱ्यांचे दुःख बांधावर जाऊन पाहिलेले नाही.  विरोधक आपापल्या परीने या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे दौरे करत आहेत. आठ दिवसांपूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा दौरा झाला. त्याचबरोबर माजी कृषिमंत्री अनिल बोंडे मराठवाड्यात आहेत .

बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांनी दोन वेळा आपल्या मतदारसंघाचा दौरा केला. मात्र तरीही प्रशासन गांभीर्याने घेत नाही, पंचनामे करत नाही. खरं तर प्रत्येक जिल्ह्याची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा आतच आहे . ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती आहे. गावाच्या गावे पुराने वेढली.  सोयाबीनच्या गंजी पुरात वाहून जात आहेत . उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले .

तीन पाझर तलाव फुटले, हे सारे दुःख पाहण्यासाठी मायबाप सरकार तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मुंबई सोडायला तयार नाहीत याचं दुःख  वाटतं. वास्तविक पाहता तातडीने मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात पाय ठेवून शेतीच्या नुकसानीची पाहणी करायला हवी. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खुर्च्या  टिकवण्यासाठी तारेवरची कसरत मातोश्री बंगल्यात बसून करतात तर विधानपरिषदेचे नाव राज्यपालांकडे पाठवण्यासाठी सर्वकाही वेळ देतात.  मात्र मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या जीवनात आलेले  दुःख पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही, हे दुर्दैव म्हणावं  लागेल. मुख्यमंत्री सोडा, मराठवाड्यात एकाही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केलेली नाही.

प्रशासनाला धाक राहिलेला नाही. आज परिस्थिती गंभीर असून प्रचंड शेतकऱ्यांच्या मनामध्ये संताप व्यक्त होत आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना बळी गेले.  अशा परिस्थितीत अतिवृष्टीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. परतीचा पाऊस गेल्या पंधरा वर्षांत कधीच पडला नाही.  खरं तर मुख्यमंत्र्यांनी वाहनांनी  दौरा करता आला नाही तरी हेलिकॉप्टरने दौरा केला तरी मांजरा काठ ते गोदावरी काठ पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं  असतं. सरकारचे डोळे उघडायला तयार नाहीत. आता शेतकऱ्यांची आशा संपलेली आहे. सरकार मदत करत नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे. हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सरकारमध्ये नव्हते तेव्हा औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदत मागितली होती. ती आज भूमिका  कुठे गेली? तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. तुमच्यासमोर शेतकरी का दिसत नाही? शेतकऱ्यांचे प्रश्न का लक्षात घेत नाहीत?

शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना तुम्ही मुंबईत बसून डोळ्यांनी पाहता? म्हणजेच शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळता.  खरं तर मुख्यमंत्री आले आणि काही घोषणा केली तर मायबाप सरकारकडून सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या मनाला थोडा दिलासा मिळत असतो. जनतेचे दुःख जाणून घेणारा राजा असावा लागतो. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या डोळ्यांनी शेतकऱ्यांचे हाल पाहतात. पण प्रत्यक्ष बांधावर येऊन मराठवाड्यात पाय ठेवीत नाहीत. त्यांनी जर वस्तुस्थिती पाहिली तर काही कळवळा आल्यासारखं वाटेल. पण अशा प्रकारे कुठल्याही भूमिकेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत. तिन्ही पक्षांचे सत्ताधारी आरोप-प्रत्यारोप या राजकारणात गुंतलेले आहेत. राज्याचा विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहताना त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडताना दिसतो.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर व अन्य नेते ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी धावपळ करताना दिसतात. काही महत्त्वाच्या सूचनाही सरकारला फडणवीसांनी केल्या. मात्र ठाकरे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही. कितीही नुकसान झालं तरी त्यांच्याकडे बघायला तयार नाही. मायबाप सरकारच्या संवेदना बोथट झाल्या. नव्हे, तर भावना नसलेलं  हे सरकार असून, केवळ सत्तेच्या नशेत सरकार मश्गूल झालेलं दिसत आहे, असे कुलकर्णी यांनी पत्रात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER