शिवसेनेकडून औरंगाबाद नामांतराच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष; भाजपचा आरोप

Keshav Upadhye

मुंबई : औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्यासाठी भाजपने (BJP) १९९५ पासून चार प्रस्ताव औरंगाबाद पालिकेला दिले होते. अनेक स्मरणपत्रेही दिली; पण शिवसेनेने (Shivsena) त्याकडे दुर्लक्ष केले, असे  सांगतानाच जेव्हा जेव्हा औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा शिवसेनेने कच खाल्ली. त्यांची वृत्ती औरंगजेबासारखी दिसून आली, असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी आज केला. केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषद घेऊन औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेचे पितळ उघडे पाडले.

औरंगाबादचे  नामांतर संभाजीनगर करण्यासाठी आम्ही १९९५ मध्ये महापालिकेत प्रस्ताव दिला होता. युतीच्या काळात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि नंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने नामांतराच्या  प्रस्तावाला बाजूला सारले. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकदा नव्हे तर दोनदा नामांतराचा प्रस्ताव फेटाळला. त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आज शिवसेना मांडीला मांडी लावून बसली आहे, अशी टीका उपाध्ये यांनी केली. भाजपने औरंगाबाद पालिकेकडे चारदा नामांतराचा प्रस्ताव पाठवला आहे; पण शिवसेनेने हा प्रस्ताव दाखल करून घेतला नाही.

तसेच बोर्डावरही हा प्रस्ताव आणला नाही, असा गंभीर आरोप करतानाच भाजपचे तत्कालीन नगरसेवक राजू शिंदे यांनी महापौरांना स्मरणपत्रे  लिहिली असता ‘वारंवार स्मरणपत्रं लिहू नये’  असे  महापौरांनी इतिवृत्तात म्हटल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. औरंगाबादच्या नामांतराचं शिवसेनेच्या मनात होतं तर प्रस्ताव पुढे का आला नाही? असा सवालही त्यांनी केला. औरंगाबादच्या विषयात शिवसेनेची भाषा ही औरंगजेबासारखी आहे. शिवसेना ही औरंगजेबाची सेना झाली आहे. ते बोलतात एक आणि करतात वेगळंच. जेव्हा जेव्हा नामांतराची संधी चालून आली तेव्हा तेव्हा शिवसेनेने माघार घेतली. औरंगाबादच्या नामांतराकडे साफ दुर्लक्ष केलं.

आता निवडणुका जवळ आल्याने शिवसेना नामांतराचा विषय बाहेर काढत असून शिवसेनेचं हे मतांचं राजकारण असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारने नामांतराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER