मागील ७० वर्षांमध्ये देशात काहीच झाले नाही; राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल

rahul gandhi

मुंबई : कॉंग्रेसचे वरीष्ठ नेते राहुल गांधी अखेर महाराष्ट्रात आले आणि अनावधानाने केलेल्या एका विधानाने पुन्हा सत्ताधा-यांनी त्यांना ट्रोल केले आहे. लोकसभेच्या वेळीही राहुल गांधींनी महाराष्ट्रात सभा घेतल्या. परंतु, शिवसेनेचा आयात उमेदवाराच्या जोरावर चंद्रपूर वगळता राज्यात एकही कॉंग्रेसचा खासदार होऊ शकला नाही. विधानसभेवेळीही प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचार सभेसाठी आले आहेत. मात्र, आताही राहुल गांधींमुळेच महाराष्ट्रात भाजपाचा विजय निश्चित आहे असे भाजपाचे नेते छातीठोकपणे सांगत आहेत. त्याला कारणही तसेच आहे.

विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांच्या रविवारी मुंबईत चांदिवली व धारावी येथे जाहीर सभा झाल्या. त्या वेळी बोलताना, त्यांनी मोदी आणि भाजपला लक्ष्य केले. मात्र यावेळेस बोलताना राहुल गांधी यांनी चुकून पाच वर्षांऐवजी मागील ७० वर्षांमध्ये काहीच झाले नाही असे वक्तव्य केले. ही चूक राहुल यांच्या लक्षात आली नाही. आता हाच व्हिडिओ भाजपा समर्थकांकडून ‘राहुल गांधी आमचे स्टार प्रचारक आहेत’ अशा अर्थाने शेअर केला जात आहे. भाजपाच्या काही नेत्यांनाही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळात मोजक्या लोकांना फायदा होत असल्याची टीका राहुल यांनी आपल्या भाषणात केली. याच भाषणात ते चूकून पाच वर्ष सरकारच्या हाती सत्ता देऊन पाहिले असं म्हणण्याऐवजी ७० वर्ष सत्ता देऊन पाहिली असं म्हणाले. ‘मोदी सरकार १०-१५ लोकांना रोज लाखो करोडो रुपये देतात. तेच पैसे त्यांनी भारतातील शेतकऱ्यांना, धारावीतील तरुणांना उद्योग धंद्यांसाठी दिला तर देशात चमत्कार होईल. हेच काम काँग्रेस करेल. प्रयत्न करुन झालेत ७० वर्षात काय झाले. काहीच झाले नाहीय हे दिसतयं.

संपूर्ण व्यवस्थाच नष्ट करुन टाकली,’ असं राहुल आपल्या भाषणात म्हणाले. राहुल यांच्या भाषणातील हाच तुकडा आता भाजपाच्या नेत्यांनी व्हायरल केला आहे. मात्र हा व्हायरल व्हिडिओ मध्येच कट करण्यात आल्याने ‘काँग्रेसला ठाऊक आहे देश कसा चालवायचा. लोकांना एकत्र कसे पुढे न्यायचे. आम्ही खोटी आश्वासने देत नाहीत,’ ही राहुल यांची वक्तव्य या व्हिडिओत दिसत नाहीत.

भाजपाचे खासदार प्रवेश साहेब सिंग, भाजपाचे दिल्लीमधील प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा अशा अनेक व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्रात भाजपाचा विजय निश्चित आहे. स्टार प्रचारक सुट्ट्यांनंतर काँग्रेसची सुट्टी करण्यासाठी आले आहेत. काँग्रेसची पोलखोल करताना राहुल गांधी,’ असं सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.