अहंकारातूनच आपण मुंबईकरांचे नुकसान करत आहात; भाजपचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

Keshav Upadhye & Uddhav Thackeray

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी प्रस्तावित असलेल्या कांजूरमार्ग येथील जागेवरून सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. अशातच न्यायालयानं कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी मुंबई मेट्रो आणि कारशेडच्या प्रस्तावित जागेवर भाष्य केलं.

मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला होता. यानंतर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.अभिमान आणि अहंकार यात अंतर असतं. मुंबईबद्दल अभिमान असलाच पाहिजे; पण अहंकारातून आपण मुंबईकरांचे  नुकसान करत आहात.

ज्या कांजूरमार्गचे समर्थन आपण करत आहात, त्या ठिकाणी कारशेड होण्यातल्या अडचणी आपण नेमलेल्या मनोज सौनिक समितीने दाखवून दिल्या  आहेत. कांजूरचा फिजिबिलिटी रिपोर्ट व अन्य अहवाल कुठे याचाही आपल्या आजच्या भाषणात  उल्लेख नाही, असे  उपाध्ये म्हणाले. मेट्रो कारशेड हा कुणाच्या श्रेयाचा प्रश्न नाही तर मुंबईकरांना आवश्यक असलेल्या सेवेचा आहे.  त्यामुळे अन्यत्र लक्ष वेधण्यापेक्षा उद्धव ठाकरे सरकारने नेमलेल्या मनोज सौनिक समितीचा अहवाल आजच्या भाषणात मांडायला हवा होता. म्हणजे वस्तुस्थिती काय ते लक्षात आलं असतं, असंही ते म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे  आजचे  समाजमाध्यमावरील भाषण म्हणजे कृती आणि उक्ती यांच्यातल्या अंतराचे  उत्तम उदाहरण होते. गेले वर्षभर सरकार विकास करत असल्याचा दावा त्यांनी केला व आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ जी चार उदाहरणे  दिली ती सर्व कामे मागच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झाली होती. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनेने विरोध केला होता. इतकंच काय गिरगावात मेट्रो आणायला विरोध केला होता. बुलेट ट्रेनला विरोध आणि अन्य विकास प्रकल्पांना  विरोध व स्थगिती हे या सरकारचे वैशिष्ट्य आहे, असं म्हणत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER