त्यांच्या पक्षातील नेतेही आमच्या संपर्कात – अजित पवार

Ajit Pawar-NCP

परभणी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागलेली असून, पक्षातील अनेकमातब्बर नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करतांना दिसत आहे. आणि याच मुद्द्यावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीतील काही नेते सत्ताधारी पक्षात जात आहेत. जसे आमच्याकडे आऊटगोइंग सुरु आहे, तसे त्यांच्या पक्षातील नेतेही नवीन येणाऱ्या नेत्यांमुळे अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते आमच्या संपर्कात आहेत. आम्हालाही तसे निरोप येत आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या दिवशी खरे चित्र समोर येईल, असा दावा त्यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

तसेच सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी याबाबतही प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची बातमी ऐकली आहे; परंतु, या संदर्भात लेखी स्वरुपात काहीही मिळालेले नाही. त्यामुळे जोपर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत हातात मिळणार नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणे योग्य नाही, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना दिली.

यावेळी ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी मी राज्य सहकारी बँकेचा संचालक जरुर होतो. त्यावेळी राज्याचा उपमुख्यमंत्री, मंत्री होतो. त्यामुळे संचालक मंडळाच्या काही बैठकांना हजर होतो; परंतु, कमिटीच्या एकाही बैठकीला हजर नव्हतो.

संचालक मंडळात जवळपास ५५ विविध राजकीय पक्षांचे संचालक होते. न्याय व्यवस्थेविषयी आपणास नितांत आदर असून न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिल्याची बातमी कानावर आली आहे. अजून मला या संदर्भात काही वाचण्यास मिळाली नाही. त्यामुळे जोपर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत हातात मिळणार नाही, तोपर्यंत यावर काहीही भाष्य करणे उचित नाही, असे अजित पवार म्हणाले.