भाजपा – शिवसेना युती कुठल्याही परिस्थितीत होणारच! – रावसाहेब दानवे

Raosaheb Danve

पालघर :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची हाक दिली असूनही, भाजपाचे नेते मात्र ही युती कायम राहणार असल्याचा दावा करतांना दिसत आहे. येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती होणारच असे जाहीर करीत, येत्या २०१९ ची निवडणूक आम्हीच जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये केला. पालघर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षीय पदाधिकाºयांशी भेटून कामाचे नियोजन आणि जबाबदारी निश्चित करीत, पक्ष बांधणीच्या दृष्टीने पालघरच्या विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा : २०१४ साली युती तोडतांना हिंदुत्वाचा विचार का आला नाही! – संजय राऊत

यावेळी ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी स्वत: आणि संघटकमंत्री पुराणिक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, २० जिल्ह्याचा दौरा पूर्ण केला आहे. २८८ लोकसभा मतदार संघात विस्तारकांची नेमणूक करून बूथ गठन करण्याचे काम हाती घेतले असून, राज्यातील एकूण ९२ हजार बुथपैकी ८८ हजार बुथचे गठन पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.

एक लोकसभेंतर्गत ६ विधानसभा येत असून, प्रत्येक विधानसभेतील ३०० बुथवर एका अध्यक्षांच्या हाताखाली १५ पुरुष आणि १० महिला अशा कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात आली आहे. त्यामुळे ४० ते ५० लाख कार्यकर्ते निवडणुका जाहीर होताच कामाला सुरुवात करणार असल्याची योजना भाजपाने आखल्याचे त्यांनी सांगितले. या संघटनात्मक बांधणीच्या जोरावर आणि प्रधानमंत्री मोदीवर लोकांचा असलेला विश्वास या जोरावर आम्ही २०१९ची निवडणूक जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला. बुलेट ट्रेन उभारणीत शेतकºयांच्या जमिनी गेल्याने त्यांचा विरोध होणारच, पण आमचे सरकार यातूनही मार्ग काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ही बातमी पण वाचा : चार राज्यांच्या निकालाचे असे आहेत वेगवेगळ्या वृत्त वाहिन्यांचे एक्झिट पोल

यावेळी त्यांनी विरोधकांकडून स्थापन करण्यात येणाऱ्या महाआघाडीबाबतही भाष्य केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत सध्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्यांच्यात पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? यावरून वाद सुरू आहे. पाच राज्यांत झालेल्या निवडणुकीच्या एक्झिट पोलबाबत त्यांना छेडले असता, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा एक्झिट पोल भाजपाच्या विरोधात असताना दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता आल्याची त्यांनी नमूद केले. यावेळी बैठकीला आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आ.संजय केळकर, आमदार पास्कल धनारे आदी नेते उपस्थित होते.