युतीसाठी मने जुळली, फक्त चर्चा अद्याप बाकी ; सुधीर मुनगंटीवार

sudhir

मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप -शिवसेनेची युती होणे गरजेचे आहे . जर युती झाली नाही तर त्याचा फटका दोन्ही पक्षाला बसणार आहे . मात्र येत्या लोकसभा निवडणूका दोन्ही पक्षांनी युती करून एकत्र लढवावाव्यात अशीच मानसिकता दोन्ही पक्षातील नेत्यांची आहे. युतीसाठी मने जुळली, फक्त त्यासाठीची चर्चा अद्याप बाकी आहे. लोकसभेच्या जागांची बोलणी करतानाच विधानसभेचेही जागावाटप व्हावे यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात पत्रकारांना दिली .

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेची युती होऊ नये यासाठी कोणतेच ठोस कारण नाही . सत्तेत मित्र पक्ष म्हणून आल्यानंतर भाजपाच्या तुलनेत त्यांच्या वाट्याला फारशी समाधानकारक अशी खाती आली नाही. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे . मात्र आता लोकसभेसोबतच विधानसभेतील युतीचाही प्रश्‍न सोडविला जाईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात १५ हजार रुपयांची वाढ करा – सुधीर मुनगंटीवार

लोकसभेच्या जागा वाटपाचा विषय लवकरच सुटेल. मात्र विधानसभेचे जागावाटप दोन्ही पक्षांच्या दृष्टीने कठीण ठरणार आहेत . दरम्यान शिवसेनकडून पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर आदी ठिकाणच्या काही जागांसाठी आग्रह धरला जाण्याची शक्यताही मुनगंटीवार यांनी वर्तविली . युतीसाठी भाजपतर्फे वारंवार शिवसेनेची मनधरणी करण्यात येत आहे .

त्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न भाजपाच्या बाजूने केला जाईल, असे सांगत मुनगंटीवार यांनी आगामी दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेनामध्ये युती होईल असा विश्‍वास व्यक्त केला. तसेच ऑक्टोंबर महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जुलै महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली .

ही बातमी पण वाचा : क्रीडा विभागाने मिशन शक्तीसाठी जिल्ह्यांची निवड करून खेळाडू तयार करावेत – सुधीर मुनगंटीवार