ठाणे: मनपाशी संबंधित प्रश्नांबाबत भाजपाचे आयुक्तांना निवेदन

TMC

ठाणे : राज्यातील प्रश्नांच्या सोबतच ठाणे महापालिकेच्या प्रश्नावर देखील आंदोलन करणाऱ्या भाजपने पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले असून ५०० चौरस फूट घरांना करमाफीचा प्रश्नांबाबत प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे . या महत्वाच्या प्रश्नांसोबत क्लस्टरमध्ये गावठाण कोळीवाडे वगळण्याची मागणी करण्यात आली असून पालिका आयुक्तांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी निरंजन डावखरे यांनी यावेळी केली.

ठाणे शहरातील जनतेची शिवसेनेकडून फसवणूक करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लस्टर योजनेतून गावठाण व कोळीवाडे वगळण्यात यावे, असा निर्णय घेतला होता. मात्र, गावठाण असलेल्या हाजुरीचा`क्लस्टर’मध्ये समावेश करण्यात आला. महापालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने वचननाम्यात ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता करमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. कळवा-ऐरोली रेल्वेमार्गाच्या कामातील विस्थापित २१०० कुटूंबाना कळव्यातच घरे द्यावी, दिवा परिसराला लोकसंख्येच्या प्रमाणात ३२ ऐवजी ४२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा. तसेच चोरीला जाणाऱ्या ७ दशलक्ष लिटर पाणीचोरीची चौकशी करावी, दिवा भागात आरोग्य केंद्र सुरू करावे, दिवा परिसरात बेकायदेशीररित्या डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणाऱ्या ८०० मेट्रिक टन कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने डंपिंग ग्राऊंड तातडीने बंद करावे, अशा मागण्या आमदार व शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.

एसआरएच्या ५०० फूटांच्या घरांची घोषणाच!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मुंबई व महाराष्ट्रात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत ३०० फुटाऐवजी ५०० चौरस फूट चटई क्षेत्र असलेल्या सदनिका देण्याचे जाहीर केले होते. मात्र, या संदर्भात अद्यापि कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही, याकडेही आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले.