पालघर हत्याकांडाविरोधात जनआक्रोश यात्रा काढण्यापूर्वी राम कदम पोलिसांच्या ताब्यात

Ram Kadam - Jan aakrosh yatra

मुंबई :- ‘पालघर साधू हत्याकांड आम्ही विसरलेलो नाही,’ असा इशारा देतानाच, ‘या हत्याकांडाचा तपास सीबीआयकडं (CBI) देण्याच्या मागणीसाठी खार ते पालघर (Palghar) जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा भाजपचे (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी दिला होता. त्यानुसार आज पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. राम कदम यांच्या निवासस्थानापासून यात्रेला सुरुवात होणार होती. यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाई करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. “हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दुर्दैवी असल्याची,” प्रतिक्रिया राम कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

राम कदम यांनी बुधवारी सकाळी ८.३० वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. पालघर हत्याकांडाला २११ दिवस होऊनही अद्याप कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती. राम कदम यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणीदेखील केली आहे.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सकाळपासून राम कदम यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता. राम कदम यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात येथे जमा झाले होते. यावेळी ‘भारत माता की जय’ ची घोषणाबाजी केली होती. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी कारवाई करत राम कदम आणि त्यांच्या जवळपास १०० समर्थकांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी त्यांनी हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER