बंगालमध्ये भाजपला धक्का; भाजपचा अपेक्षाभंग, महाराष्ट्रात ठाकरे सरकारच राहणार

मुंबई : २ मेपर्यंत वाट बघा. पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे निकाल हाती येताच महाराष्ट्रातील ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार कोसळणार, असा दावा गेल्या महिनाभरापासून भाजप नेते करत होते. मात्र, आज निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीच सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपचं (BJP) ‘मिशन महाराष्ट्र’ही बारगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मीरा भाइंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. त्यावेळी त्यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे सूचक विधान केले होते.

राज्यात सर्वांत कमी संख्याबळ असलेली काँग्रेस (Congress) सत्तेत आहे. त्यांचा ठाकरे सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वांत  मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षात बसला आहे. हा लोकमताचा अनादर आहे. लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवून. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल, असं फडणवीस म्हणाले होते.तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तर २ मेपर्यंत वाट बघा, पश्चिम बंगालचे निकाल हाती आल्यानंतर महाराष्ट्रातही सत्तापालट होणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे बंगालच्या निवडणुकीवर महाराष्ट्रातील सत्तांतर अवलंबून असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, मार्च महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात अहमदाबादमध्ये गुप्त बैठक झाली होती.

एका वृत्तपत्राने या भेटीचं वृत्त देऊन एकच खळबळ उडवून दिली होती. या भेटीनंतर बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असंही म्हटलं जात होतं. त्याच वेळी भाजप नेते राम शिंदे यांनाअमित शहा  आणि शरद पवार यांच्या भेटीविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राम शिंदे यांनी, ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी मोघम पण सूचक प्रतिक्रिया देऊन संभ्रमात भर टाकली होती. भाजपचे नेते बंगालमध्ये सत्तांतरण होण्याचा दावा करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या रणनीतीद्वारे बंगालमध्ये सत्ता स्थापन करता येईल, अशी अपेक्षा भाजपला होती.

त्यामुळेच बंगालमध्ये सत्ता मिळवल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्याची भाजपची योजना होती. तसे  भाजपचे नेतेही म्हणत होते. मात्र, बंगालमध्ये पराभव झाल्याने भाजपचे  ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळण्याची शक्यता आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे संकट असल्याने भाजप राज्यात सत्तांतर घडवण्याचा प्रयत्न करेल याची शक्यता नाही. तसं झाल्यास भाजपच्या विरोधात जनमत जाऊ शकतं. त्यामुळे भाजप चुकूनही महाराष्ट्रात सत्तांतर करण्याचा प्रयत्न करणार नाही, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button